भाजपला उत्तर महाराष्ट्रात मोठा फटका…संकटमोचक गिरीश महाजनांचे मंत्रिपद जाणार ?

जळगाव टुडे । लोकसभेच्या अतिशय चुरशीत पार पडलेल्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली असून, भाजपा प्रणित महायुतीला अनेक ठिकाणी पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. उत्तर महाराष्ट्रातही भाजपला मोठा फटका बसला असून, त्यांच्या आठपैकी फक्त दोनच जागा निवडून आल्या आहेत. जळगाव आणि रावेर वगळता कुठेच भाजपचे नामोनिशाण शिल्लक राहिलेले नाही. त्याचे खापर अर्थातच भाजप नेते संकटमोचक गिरीश महाजन यांच्या डोक्यावर फुटण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे. (Girish Mahajan)

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी आणि नगर या आठ जागांची जबाबदारी भाजप नेते संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर महायुतीकडून टाकण्यात आली होती. त्यानुसार जळगाव आणि रावेरच्या जागांवर लक्ष ठेवून अन्य सहा जागांवर महायुतीला यश मिळवून देण्यासाठी मंत्री महाजन यांना खूपच तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान, सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मोठे यश मिळाले होते. त्यामुळे यंदाही आपण सर्वच्या सर्व आठ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकू, असा आत्मविश्वास मंत्री महाजनांना होता. प्रत्यक्षात निवडणूक आघाडीवर महायुतीच्या उमेदवारांवर असलेली स्थानिकांची नाराजी आणि मोदी विरोधी लाटेने जळगाव तसेच रावेर वगळता उत्तर महाराष्ट्रातील अन्य सर्व लोकसभा मतदारसंघात महायुतीचा धुव्वा उडाला.

“रिंगसाईड रिसर्च” एक्झिट पोलचा अंदाज तंतोतंत खरा ठरला….
जळगाव आणि रावेर मतदारसंघ वगळता उत्तर महाराष्ट्रातील अन्य सहा लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा पराभव पत्करावा लागू शकतो, असा अंदाज “रिंगसाईड रिसर्च” एक्झिट पोलच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला होता. धुळ्यात काँग्रेस, नंदुरबारमध्ये काँग्रेस, दिंडोरीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट, नगरमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाजी मारतील, असेही “रिंगसाईड रिसर्च” एक्झिट पोलने स्पष्ट केले होते. सदर एक्झिट पोलचा अंदाज तंतोतंत खरा ठरल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे.

मंत्री गिरीश महाजनांना बहुतेक मंत्रि‍पदावर पाणी सोडावे लागणार ?
उत्तर महाराष्ट्रात आठपैकी जेमतेम दोन जागांवरच महायुतीला यश मिळल्याने संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची ‘महाजनकी’ चांगलीच धोक्यात आली आहे. कारण, राज्यातील लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोर का झटका देण्यात उत्तर महाराष्ट्राचाही मोठा वाटा राहिला आहे. महायुतीच्या उत्तर महाराष्ट्रातील अपयशाला साहजिकच गिरीश महाजन यांनाच आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून जबाबदार धरले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहुतेक त्यामुळे महाजन यांना सध्याच्या मंत्रिपदावर देखील पाणी सोडावे लागू शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button