‘या’ कारणाने यंदा महाराष्ट्रात महायुतीच्या जागा कमी झाल्या…मंत्री गिरीश महाजनांची कबुली !
जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीत देशात पुन्हा नरेंद्र मोदी सरकार स्थापन होणार असल्याचा अंदाज एक्झिट पोल्सच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रात महायुतीचे बारा वाजण्याचे आणि महाविकास आघाडीला पुन्हा सुगीचे दिवस येण्याचे संकेत मिळाले आहेत. उत्तर महाराष्ट्रातही महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. त्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी नेमक्या कोणत्या कारणांमुळे राज्यात महायुतीच्या जागा कमी झाल्या, त्याची जाहीर कबुली दिली आहे. (Girish Mahajan)
एक्झिट पोलमध्ये राज्यात महायुतीला फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर देखील गिरीश महाजन यांनी दावा केला आहे, की “राज्यात आमच्या जागा कमी असल्याचे दाखविले जात असले तरी किमान 35 जागा आम्हाला यावेळी मिळतील. त्याचप्रमाणे “उद्याच्या निकालात तुम्हाला ते तुम्हाला पाहायला मिळेल. राज्यात जागा कमी येत आहेत हे खरे आहे. त्यामागे वाढती महागाई, शेतकरी प्रश्न आणि आरक्षणाचा मुद्दा होता. तसेच काही ठिकाणी उमेदवार बदलण्याची गरज होती, ते बदलले गेले नाही. त्यामुळेही महाराष्ट्रात महायुतीच्या जागा कमी होत असल्याचे दिसते,” असेही स्पष्टीकरण मंत्री महाजन यांनी दिले आहे.
दरम्यान, राज्यातील फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला असे हे राजकारण फारसे रुचलेले नाही. त्यामुळेच राज्यात महायुतीच्या काही जागा कमी झाल्याचे चित्र दिसत असल्याचे बोलून आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपला नुकताच घरचा आहेर दिला. त्यासंदर्भात बोलताना एकनाथ खडसेंची भूमिका दुटप्पीपणाची आहे आणि ते सध्या कोणत्या पक्षात आहेत, हे देखील त्यांना ही कळत नसल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.