उत्तर महाराष्ट्रात संकटमोचक गिरीश महाजन यांची ‘महाजनकी’ धोक्यात ?

दोनच जागांवर विजय मिळण्याची शक्यता

जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील सर्व आठ जागांची जबाबदारी भाजप नेते संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर महायुतीकडून टाकण्यात आली होती. प्रत्यक्षात निवडणूक पूर्व एक्झिट पोलनुसार उत्तर महाराष्ट्रात जेमतेम दोन जागांवरच महायुतीला यश मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आठपैकी मोजून दोनच जागा मिळाल्यानंतर अर्थातच संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची ‘महाजनकी’ चांगलीच धोक्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. कारण, त्यांनी सर्वच्या सर्व आठ जागांवर महायुतीच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. (Girish Mahajan)

उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्याने जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, नगर आणि शिर्डी या आठ लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून जळगावमध्ये स्मिता वाघ, रावेरमध्ये रक्षा खडसे, धुळ्यात डॉ.सुभाष भामरे, नंदुरबारमध्ये डॉ.हिना गावित, नाशिकमध्ये हेमंत गोडसे, दिंडोरीत डॉ.भारती पवार, नगरमध्ये डॉ.सुजय विखे पाटील आणि शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, जळगावमध्ये मावळते खासदार उन्मेश पाटील यांना तिकीट नाकारून भाजपने खूप मोठी जोखीम यावेळी पत्करली. त्यामुळे नाराज झालेल्या उन्मेश पाटलांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून भाजपसाठी सोपी असलेली जळगावची निवडणूक कठीण करून टाकली. नाराजांची समजूत घालण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रख्यात असलेले संकटमोचक गिरीश महाजन पाटलांची नाराजी मात्र दूर करू शकले नाही. रावेर तसेच धुळे, नंदुरबार व दिंडोरीत स्थानिकांचा तीव्र विरोध असतानाही पूर्वीचेच उमेदवार कायम ठेवण्याचा अट्टाहास भाजपने केला. परिणामी, पक्षांतर्गत विरोध तसेच तीव्र नाराजी, टीका टीपण्णी सहन करतच भाजपच्या उमेदवारांना आपला प्रचार करावा लागला. प्रचार आघाडीवर निर्माण झालेले निरूत्साहाचे वातावरण मतदानाच्या दिवसापर्यंत कायम राहिले. त्याचाच मोठा फटका महायुतीला निकालात बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महायुतीला पत्करावा लागू शकतो मोठा पराभव

दरम्यान, महाराष्ट्रातील 48 जागांच्या “रिंगसाईड रिसर्च” एक्झिट पोलची आकडेवारी आता समोर आली आहे. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रात महायुतीला जोरदार धक्का बसण्याची चिन्हे दिसून आली असून, महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळण्याची शक्यता दिसत आहे. जळगाव आणि रावेर वगळता अन्य सहा लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा पराभव पत्करावा लागू शकतो, असा अंदाज “रिंगसाईड रिसर्च” एक्झिट पोलच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. धुळ्यात काँग्रेस, नंदुरबारमध्ये काँग्रेस, दिंडोरीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट, नगरमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाजी मारतील, असेही “रिंगसाईड रिसर्च” एक्झिट पोलने स्पष्ट केले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button