भुजबळांची नाराजी गोदातीरी; मंत्री गिरीश महाजन घेऊन पोहोचले लोण्याची कटोरी !
जळगाव टुडे । छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून नाराज असल्याची चर्चा सुरू असताना आणि त्यांच्या नाराजीचे वृत्त माध्यमांत येताच भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शुक्रवारी (ता.17) तातडीने त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा सुद्धा झाली. त्या चर्चेतून महाजन यांनी भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, यावरुन विरोधी पक्षांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधून त्यांच्याबद्दल एक मोठे विधान केले आहे.
छगन भुजबळ यांनी काही दिवसांपासून महायुतीच्या प्रचार सभांपासून दूर राहणे पसंत होते. तरीही त्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक जिल्ह्यात झालेल्या सभेला हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याचे बोलले जात होते. दरम्यान, शुक्रवारी (ता.17) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भुजबळ नाराज असल्याचे माझ्या कानावर आले आहे, असे विधान केले. त्यामुळे भुजबळांच्या नाराजीचे वृत्त सगळीकडे पुन्हा वाऱ्यासारखे पसरले. भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांनाही पुन्हा नाशिक येथील भुजबळांचा फार्म गाठावा लागला.
दरम्यान, “भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे दूध, दही आणि लोणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिथे गरज पडली तिथे ते लोण्याचे कटोरी घेऊन जातात आणि जेवढे लोणी लावता येईल, तेवढे लोणी लावतात. या माध्यमातून ते समोरच्याची नाराजी दूर देखील करतात. त्यांच्याकडे एवढेच काम उरले आहे तसेच त्यांच्याकडे लोण्याने भरलेली मडके आहे,” अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.