शरद पवार कधी पावसात भिजतात, कधी रडतात तर कधी आजारी पडतात…!

भाजपचे नेते गिरीश महाजन यांची टीका

Jalgaon Today : “कधी पावसात भिजायचं, कधी रडायचं, कधी आजारी पडायचं हा पवारांचा वैयक्तिक प्रश्न आहे. शरद पवारांची तब्येत खराब असते, त्यांच्या तब्येतीवर बोलणे उचित होणार नाही. मात्र रोहित पवार हे सध्या थोडे काही झाले की लगेच रडायला लागतात. मला वाटते रडून निवडणुका लढता किंवा जिंकता येत नाहीत. तुम्ही फार वेळ मतदारांना भावनिक करू सुद्धा शकणार नाहीत. पवारांनी मुद्द्यावर आणि विकासावर बोलावे आणि त्यावर मत मागावी,” अशी टीका भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी येथे केली.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिव प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापक तथा कोअर कमिटी सदस्यांची बैठक सोमवारी (ता.06) जळगाव येथे पार पडली. त्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. सदरच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री श्री.महाजन बोलत होते.

गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टिकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे आमदार-खासदार हे भाजपच्या जीवावर निवडून आले होते. आम्ही नसतो तर उद्धव ठाकरेंना 15 आमदार तरी निवडून आणता आले असते का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर देखील यावेळी निशाणा साधला. “संजय राऊत यांच्या जिभेला कुठलेही हाड नाही. कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही असे संजय राऊत बोलतात. त्यांच्या बोलण्याला आता मी महत्त्व देत नाही. जनताही संजय राऊत यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही,” असेही मंत्री महाजन म्हटले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button