जळगाव तालुक्यातील रामदेववाडी नजिकच्या अपघातातील मृतांची संख्या झाली चार
जळगाव टुडे : तालुक्यातील रामदेववाडी गावानजिक मंगळवारी (ता.07) झालेल्या भीषण अपघातात राणी सरदार चव्हाण (वय ३०), सोमेश सरदार चव्हाण (वय ०२), सोहन सरदार चव्हाण (वय ०७) यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेला लक्ष्मण भास्कर राठोड (वय १२, रा. लोंढ्री,ता.जामनेर) याचाही रात्री १२ वाजेच्या सुमारास रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे रामदेववाडी नजीकच्या अपघातातील मृतांची संख्या आता चार झाली आहे.
राणी चव्हाण या दोन्ही मुले सोहन व सोमेश चव्हाण आणि भाचा लक्ष्मण भास्कर राठोड यांच्यासह जळगावी कामानिमित्त निघाल्या होत्या. रामदेववाडी गावाच्या बाहेर आल्यावर समोरून आलेल्या भरधाव कारने (एम एच १९ सी.व्ही. ६७६७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात राणी चव्हाण आणि तिन्ही मुले रस्त्याच्या कडेला फेकले गेले. अपघातात राणी चव्हाण व सोमेश यांचा रस्त्यावर आपटून जागीच मृत्यू झाला तसेच डोक्याला मार लागल्याने सोहन याचा देखील मृत्यू झाला होता. राणी चव्हाण यांचा भाचा लक्ष्मण हा गंभीर जखमी झाल्याने त्यास रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मध्यरात्री त्याचीही प्राणज्योत मालवली.
कारमध्ये गांजाच्या पुड्या आढळून आल्या
घटनास्थळी अपघात झाल्याची माहिती मिळताच जमावाने रास्ता रोको केला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव संतप्त झालेला होता. यामुळे चार तास राणी चव्हाण व त्यांच्या दोन्ही मुलांचे मृतदेह घटनास्थळीच पडून होते. घटनास्थळी जमावाने दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन प्लाटून बोलावल्या. दरम्यान, ज्या कारने चौघांना उडविले त्या कारमध्ये गांजाच्या पुड्या आढळून आल्यामुळे सदर कारचा चालक हा नशा करून गाडी चालवत होता, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.