सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, पोलिसांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज आले समोर

हल्ल्यामागे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा हात असल्याचा संशय

Salman Khan : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर आज रविवारी (ता.14) पहाटे पाचच्या सुमारास अज्ञात दोन व्यक्तींनी गोळीबार केला. मुंबई पोलिसांच्या तपासात या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये दोन बाईकस्वार स्पष्टपणे दिसत आहेत. या हल्ल्याच्या घटनेमागे एक नवीन माहिती देखील समोर आली असून, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने तो केल्याचा दावा सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेविषयी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेला दुर्दैवी संबोधून “संशयित आरोपींना जेरबंद करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही. याशिवाय सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आयुक्तांना आवश्यक तो बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासन त्यांच्या पाठीशी असून मी स्वतः सलमानशी बोललो आहे,” असे सांगितले.

दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सलमान खानच्या मुंबई येथील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेविषयी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिस यंत्रणा गोळीबार प्रकरणाचा कसून तपास करीत आहे आणि पुरेशी माहिती मिळाल्यावर तुम्हाला कळविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आज मुंबईत चांगलीच खळबळ उडाली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button