Eknath Shinde : महायुतीच्या जाहीरनाम्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा…!
Eknath Shinde : विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार नारळ कोल्हापुरात फोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा जाहीरनामा सादर केला आहे. त्यामाध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. महाराष्ट्राच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
Eknath Shinde : Chief Minister made these important announcements for the farmers in the manifesto of Mahayuti…!
महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा असल्यामुळे महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा पहिला निर्णय घेण्यात येणार आहे. याशिवाय, शेतकरी सन्मान योजनेत सुधारणा करत पंतप्रधानांच्या योजनेतील ६,००० रुपये व राज्य सरकारच्या ६,००० रुपयांचे एकत्रित योगदान १२,००० वरून वाढवून आता १५,००० रुपये प्रतिवर्ष करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळून थोडाफार दिलासा मिळेल. तसेच, केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमतीवर (MSP) २० टक्के अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाच्या योग्य किमतीसाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा जाहीरनामा सादर करताना म्हटले आहे.
शेतकऱ्यांना शेतीशिवारातील पाणंद रस्त्यांअभावी पावसाळ्याच्या दिवसात खूप हाल सहन करावे लागतात. ही स्थिती लक्षात घेता राज्य सरकार पुढील काळात ४५ हजार गावात पाणंद रस्ते बांधणार आहे. याशिवाय वीजबिलात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याकरीता सौर व अक्षय उर्जेवर भर देण्यात येणार आहे.
राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रूपये देण्यात येणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सध्या महिलांना दरमहा १५०० रूपये देण्यात येत आहेत. सदरची रक्कम दरमहा २१०० रूपये करण्यात येईल, अशी घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यातून केली आहे. याशिवाय सुरक्षेसाठी पोलिस दलात सुमारे २५ हजार महिलांना भरती करण्यात येणार आहे.अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५ हजार रुपये मानधन आणि विमा सुरक्षाकवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.