जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या पर्यटन विकासासाठी सुमारे 50 कोटी रूपयांचा निधी देणार
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे भूमीपूजन
Eknath Shinde : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील पुलाच्या भूमिपूजनावेळी संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुक्ताईनगरच्या पर्यटन विकासासाठी सुमारे 50 कोटी रुपये देणार ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे (खडकाचे) व रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील पुलाच्या भूमीपूजनानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात बोलत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. किशोर पाटील, आ. संजय सावकारे, आ. चिमणराव पाटील, आ.चंद्रकांत पाटील, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, माजी आ. दशरथ भांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित उपस्थित होते.
“मुक्ताईनगरच्या या पुलामुळे 30 ते 35 किलोमीटरचा वळसा वाचणार असून आता मुक्ताईनगर आणि रावेर कमी अंतराने जोडले जाणार आहे. हा पूल नाबार्डच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे सांगून त्यासाठी निधी कमी पडणार नाही. राज्यात सगळीकडे विकासाची कामे सुरु आहेत. शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम राबविला जातो आहे. एका छताखाली सगळ्या गोष्टी मिळत आहेत. कोणाला ट्रॅक्टर मिळाले तर कोणाला घर मिळाले, कोणाला शेती अवजरे मिळाली. अशा अनेक योजनाचा थेट लाभ दिला जात आहे. उद्योगाच्या बाबतीतही शासनाने आघाडी घेतली असून पाच हजार कोटीचे नवे उद्योग राज्यात येत आहेत. त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी घेतले संत मुक्ताबाईंच्या समाधीचे दर्शन
संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव यांच्या भगिनी संत मुक्ताबाई यांची समाधी असलेल्या मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले. सगळे कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संत मुक्ताबाईंच्या समाधीचे अत्यंत श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. साडीचोळी वाहिली आणि आरतीही केली. तालुक्यातील इतर विकासकामाचे जवळपास 75 कोटी रुपयांच्या कामाचे आज मुख्यमंत्र्यांनी उदघाटन केल्याचे जाहीर केले.