जळगावमध्ये जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन
जिल्हा वार्षिक योजनेतून 6 कोटी रूपयांचा निधी
Eknath Shinde : जळगाव शहरानजिकच्या खेडी येथे प्रस्तावित असलेल्या जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. याप्रसंगी संतांच्या भूमीत साकारणाऱ्या जिल्हास्तरीय वारकरी भवनाला निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित वारकऱ्यांना दिली.
या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, माजी आ.चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, गजानन महाराज वरसाडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आज आपल्याला इथे आल्यावर वारकरी संप्रदाय भेटला आणि मनाला खूप आनंद झाला. उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या ‘वारकरी भवन’ चे भूमीपूजन होत आहे. या कामी ज्यांचे ज्यांचे हात लागले त्यांचे आभार आणि ज्यांचे लागणार आहेत सर्वांना या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो. पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी विकासकामासोबत अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले आहेत. परंतू या सर्वात महत्वाचे असे ‘वारकरी भवन’ बांधण्याचा त्यांचा निर्णय अंत्यत चांगला असल्याचे सांगून या वारकरी भवनाप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन बांधावे”, असे त्यांनी यावेळी सांगितले.
असे आहे प्रस्तावित वारकरी भवन
प्रस्तावित वारकरी भवन सुमारे 55 एकरांच्या भूखंडावर साकारणार असून त्याला 06 कोटी रूपये एवढा निधी अपेक्षित आहे. इथले वारकरी भवन इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. या वारकरी भवनास जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविण्यपूर्ण योजनेतून 6 कोटी 6 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एकूण बांधकाम- 1810 चौ.मी. असणार आहे. पहिल्या टप्प्यात सभामंडप व भक्त निवास इमारत (मुख्य इमारत ) प्रस्तावित आहे.