Eknath Khadse : एकनाथ खडसेंना जळगावमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही…?
Eknath Khadse : जळगावमध्ये आज रविवारी (ता.२५) मोठ्या थाटात लखपती दीदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही अनेक मंत्री व मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारीत असलेले आमदार एकनाथ खडसे यांना मात्र या कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही मिळाले नसल्याची माहिती मिळाली आहे.
Eknath Khadse: Eknath Khadse is not invited to Prime Minister Narendra Modi’s event…!
जळगावमधील कार्यक्रमात केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेंतर्गत ११ लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे वाटप केली जाणार होती. याशिवाय बचत गटांसोबत काम करणाऱ्या महिलांना लाभ देण्यासाठी २५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जाणार होता. पंतप्रधान मोदी लखपती दीदी योजनेच्या लाभार्थी महिलांशी संवाद सुद्धा साधणार होते. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा महत्त्वाचा दौरा मानला जात होता. या कार्यक्रमासाठी राज्यभरातील महायुतीचे सर्व मंत्री झाडून उपस्थित राहिले. मात्र ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसेंची अनुपस्थिती तिथे जाणवली. वास्तविक खडसेंनी लोकसभेच्या निवडणुकीआधीच शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेशाची तयारी चालवली आहे. केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल देखील दिला आहे.
स्थानिक नेतृत्वाकडून डावलण्याचा प्रयत्न ?
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ खडसेंना ग्रीन सिग्नल दिलेला असला तरी त्यांचा प्रत्यक्ष भाजप प्रवेश अद्याप झालेला नाही. त्यामागे भाजपच्या महाराष्ट्रातील स्थानिक नेतृत्वाचा थेट विरोध असल्याचेही बोलले जात आहे. विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असताना, आतातरी एकनाथ खडसेंना होणारा विरोध मावळेल असे वाटत होते. पण, खुद्द पंतप्रधानांच्या जळगावमधील कार्यक्रमालाच एकनाथ खडसेंना बोलावणे टाळले आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, बोलावणे आल्याशिवाय नाही….
दरम्यान, शासकीय कार्यक्रम असल्याने जिल्ह्यातील सर्व आमदारांना रितसर निमंत्रण देणे बंधनकारक होते, पण मला या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळाले नाही. वेळेत निमंत्रण मिळाले असते तरी मी कार्यक्रमाला गेलो असतो. आता निमंत्रण मिळाले तरी जाणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.