खडसेंचा भाजप प्रवेश थांबविणे आता फडणवीस किंवा गिरीश महाजनांच्या हाती राहिले नाही !

जळगाव टुडे । शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या प्रवेशाला महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस तसेच गिरीश महाजन यांच्यासारख्या नेत्यांनी विरोध केल्याची चर्चा होती. कदाचित त्यामुळेच खडसेंचा भाजप प्रवेश रखडल्याचेही बोलले जात होते. मात्र, तशा चर्चांना आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच पूर्णविराम दिला आहे. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाविषयी केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य करण्यास आपण बिनशर्त तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दैनिक दिव्य मराठीचे राज्य संपादक प्रणव गोळवेलकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली असता, एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश का रखडला आणि गिरीश महाजन नाराज आहेत का, असे काही प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आले होते. त्या प्रश्नांचे उत्तर देताना फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यातून त्यांचा एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला असलेला तीव्र विरोध आता मावळल्याचे संकेत मिळाले. त्याचप्रमाणे केंद्रीय नेतृत्वानेच निर्णय घेतलाय म्हटल्यावर तो आपल्याला मान्यच करावा लागतो, असे बोलून त्यांनी आपली हतबलता देखील नकळतपणे मुलाखतीवेळी व्यक्त केली. कितीही विरोध केला तरी खडसेंचा भाजप प्रवेश थांबविणे आता त्यांच्या किंवा गिरीश महाजन यांच्या हाती राहिलेले नाही, हाच अर्थ फडणवीसांच्या त्या उत्तरातून निघाला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, की “एकनाथ खडसेंचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश योग्यवेळी होईल. आपल्याला पक्ष वाढवायचा असतो, त्यावेळी वैयक्तिक काही गोष्टी बाजुला ठेवाव्या लागतात. संबंधातील कटुता कमी करावी लागते. केंद्रीय नेतृत्वाने एखादा निर्णय घेतला की तो आपल्याला मान्यच करावा लागतो.”

WhatsApp Group

Related Articles

Back to top button