विषयच संपला…एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाविषयी विनोद तावडे यांनी केले ‘हे’ भाष्य | Eknath Khadse

Jalgaon Today : “भारतीय जनता पक्षामध्ये एकनाथ खडसे यांचा प्रवेश निश्चितपणे होईल. खडसे (Eknath Khadse) यांच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही विरोध नाही”, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. “राज्यातील निर्णय केंद्रीय नेतृत्वाबरोबर चर्चा करूनच होतात आणि आमच्याकडे टीम वर्क आहे”, असेही श्री.तावडे यांनी म्हटले आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यात बोलताना श्री.तावडे यांनी एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मात्र अजूनही त्यांचा भाजप पक्ष प्रवेश रखडला आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या विरोधात महाराष्ट्रातील भाजपचे नाराज नेते उभे ठाकले आहेत. त्यामुळेच खडसेंचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे.

मात्र, भाजपमध्ये पक्ष प्रवेश झालेला नसताना एकनाथ खडसे हे दोन दिवसांपूर्वी यावल येथील भाजपच्या प्रचार कार्यालयात गेले होते. तिथे त्यांनी सूनबाई रक्षा खडसे यांच्या लोकसभेच्या प्रचाराबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांना सूचनाही केल्या होत्या. त्यामुळे भाजपच्या जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंच्या त्या कृतीचा जोरदार समाचार घेतला असून, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा सल्ला त्यांनी एकनाथ खडसे यांना दिला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button