संकटमोचकांची खदखद झुगारून अखेर एकनाथ खडसे सुनेच्या प्रचारात सक्रीय !
Jalgaon Today : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या वाटेवर असलेले आमदार एकनाथ खडसे यांच्या अधिकृत पक्ष प्रवेशाचा संभ्रम अद्याप कायम आहे. दरम्यान, त्यांच्या भाजपमधील घरवापसीची बातमी समजताच स्थानिक संकटमोचक नेत्यांनी त्यांचे स्वागत करण्याऐवजी उलट खदखदच व्यक्त केल्याने खडसेंचे भाजपमध्ये परत येणे बारगळते की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली होती. प्रत्यक्षात संकटमोचकांची खदखद झुगारून एकनाथ खडसेंनी आता भाजपच्याच रावेर लोकसभा उमेदवार असलेल्या सुनेच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेऊन अनेकांना मोठा धक्का दिला आहे. (Eknath Khadse)
आपण भाजपमध्ये घरवापसी करणार असून, लवकरच दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत रीतसर पक्ष प्रवेश करू, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना दिली होती. परंतु, काहीतरी कारणावरून त्यांचा दिल्लीत होणारा भाजपातील प्रवेश रखडला आणि त्यांच्या परत येण्यावरून नाराजीचा सूर आळवणाऱ्या त्यांच्या काही पारंपरिक विरोधकांनी ती एक संधी साधली. खडसेंचे भाजपमध्ये येणे आता काही सहज शक्य नाही आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे पक्ष श्रेष्ठींनी त्यांचा भाजप प्रवेश थांबवल्याची अफवा देखील पसरवून दिली. अर्थातच, खडसे समर्थकांमध्ये त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले. नाथाभाऊंनी सर्वांना सांगून तर टाकले आहे की ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मग आता कसे होईल, या विचाराने अनेकांची झोपच उडाली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार असलेल्या सून रक्षा खडसे यांच्या प्रचारात एकनाथ खडसे अचानक सक्रीय झाले. यावल शहरातील भाजपच्या प्रचार कार्यालयास भेट देऊन त्यांनी कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या. त्याबद्दल पत्रकारांनी विचारणा केल्यावर खडसेंनी स्पष्ट केले की “माझ्या भाजपमधील घरवापसीबद्दल मी स्वतः पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले होते. तेव्हा त्यांनी तुमचा पक्ष प्रवेश झालेला आहेच, तुम्हाला बैठका घेण्यास व प्रवास करण्यास काहीच हरकत नसल्याचेही सांगितले. त्यानुसार मी गेल्या दोन दिवसांपासून लोकसभेच्या प्रचारात सक्रीय झालो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास व कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षात घेता रक्षा खडसे प्रचंड बहुमताने विजयी होतील. मतदानाच्या प्रमाणावर मताधिक्य अवलंबून असेल. कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड उत्साह आहे”.