पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर नाथाभाऊंना जळगावच्या भाजपमध्ये पूर्वीचा तो सन्मान मिळेल का ?

Eknath Khadse | मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सहभागी होणे महाग पडल्यानंतर एकनाथ खडसेंना ऑक्टोबर 2020 मध्ये भाजपला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला होता. मोठ्या कालखंडानंतर आता ते पुन्हा घर वापसी करण्याच्या प्रयत्नात देखील आहेत. अर्थातच, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर नाथाभाऊंना जळगावच्या भाजपमध्ये पूर्वीचा तो सन्मान परत मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत असे काही मोजके लोकप्रतिनिधी होऊन गेले आहेत, ज्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे जन सामान्यांनीच लोकनेते पद बहाल केले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा देखील त्यात समावेश होतो. एक काळ असा होता, की भाजपमध्ये एकनाथ खडसे सांगतील ती पूर्व दिशा मानली जात असे. पक्ष श्रेष्ठींकडे शब्दाला वजन असल्याने त्यांच्याच सांगण्यावरून खासकरून खान्देशातील आमदार व खासदारांना तिकीटे वाटप होत असत. दरम्यानच्या काळात अनेकजण त्यांच्या मुशीत तयार झाले आणि राजकीय पटलावर चमकले.

एकनाथ खडसेंना वेळोवेळी कॅबिनेटमधील महत्वाची खाती मिळाली. त्याचा थेट फायदा जळगाव जिल्ह्यास पण झाला. कालौघात एकनाथ खडसेंचे नेतृत्व बहरत गेले. त्यांच्या समर्थकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत गेली. त्याचा उपयोग खडसेंनी भाजपला ओबीसी चेहरा मिळवून देण्यात केला, हे कोणी नाकारणार देखील नाही. मात्र, सर्व काही सुखनैव चालू असताना त्यांच्या मनात मुख्यमंत्री पदावर आरूढ होण्याची मनीषा दाटून आली आणि तिथेच त्यांच्या मोठा घात झाला. मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करणे खडसेंच्या अंगाशी आले. किंबहुना तेथूनच त्यांच्या राजकीय अस्ताची सुरूवात झाली. पुढे जाऊन भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणाच्या चौकशीमुळे ते चांगलेच जेरीस आले. पक्षांतर्गत लाथाडी सुरू झाल्याच्या स्थितीत शेवटी त्यांना वैतागून भाजपला रामराम करून राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधावे लागले.

आता पुन्हा ‘झाले गेले गंगेला मिळाले’ असे म्हणत त्यांनी भाजपची वाट धरली आहे खरी, पण पक्षात वापसी केल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी खासकरून जळगाव जिल्ह्यातील भाजपमध्ये आता कितीजण उभे राहतात ते सांगणे कठीण आहे. त्यांच्याशी टोकाचे वाद असलेले तत्कालिन काही सहकारी आता भाजपमध्ये चांगले स्थिरस्थावर होऊन नेते बनले आहेत. साहजिक पक्षात पुनरागमन केल्यानंतर खडसेंना आता कधीकाळी त्यांना ज्युनियर असलेल्यांच्या हाताखाली काम करावे लागणार आहे. त्यानंतरही खडसेंचे आणि पक्षात आता मोठ्या पदावर असलेल्या नेत्यांचे व लोकप्रतिनिधींचे चांगले जमेल, याची गॅरंटी कोणीच देणार नाही.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button