एकनाथ खडसे नेमके कोणाच्या बाजुने…? भाजपच्या नेत्यांना पडला मोठा प्रश्न !
जळगाव टुडे । विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारांना खूश करण्यासाठी अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लाभाच्या अनेक योजना महायुतीकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महायुतीच्या या अर्थसंकल्पावर भाजपमध्ये घरवापसी करण्याच्या प्रयत्नात असलेले एकनाथ खडसे यांनी नेहमीच्या शैलीत जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारकडे कर्ज फेडण्यासाठी पैसा शिल्लक नसताना नवीन योजनांसाठी आणखी पैसा कुठून आणणार? असाही सवाल खडसेंनी उपस्थित केला आहे. महायुतीला घरचा आहेर देणारे एकनाथ खडसे हे नेमके कोणाच्या बाजुने आहेत, असा मोठा प्रश्न भाजपच्या नेत्यांनाही त्यामुळे पडला आहे. ( Eknath Khadse )
कोणाची भीड न बाळगता रोखठोक बोलण्यासाठी एकनाथ खडसे हे पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बऱ्याचवेळा ते भाजपमध्ये असताना अडचणीत देखील आले आहेत. आताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली होती. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, त्यासाठी त्यांना राज्याचे नेतृत्व करणाऱ्या भाजपमधील काही नेत्यांचा छुपा विरोध होत आहे. अशा या परिस्थितीत थोडी नमती भूमिका घेण्याऐवजी उलट भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला टार्गेट करण्याची एकही संधी एकनाथ खडसे सोडत नसल्याचे दिसून येत आहे. असे केल्याने आपला भाजपमधील प्रवेश आणखी लांबणीवर पडू शकतो, याचीही तमा त्यांनी बाळगलेली नाही. त्यामुळे राज्यातील भाजपमध्ये असलेला त्यांच्याबद्दलचा दुराग्रह कमी होण्याऐवजी आणखी वाढत चाललेला आहे.
शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर बोलताना देखील एकनाथ खडसेंनी महायुती सरकारवर थेट निशाणा साधला. हा अर्थसंकल्प केवळ आगामी विधानसभा निवडणुका समोर ठेऊन सादर केल्याचे सडतोड वक्तव्य त्यांनी केले. सध्या जेवढ्या काही घोषणा केल्या आहेत, त्या अत्यंत चांगल्या आहेत. मात्र, त्या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी आता पुरेसा वेळच शिल्लक नाही. सध्या राज्य सरकारच्या डोक्यावर सुमारे सात लाख कोटी रूपयांचे कर्ज आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी पैसा शिल्लक नसताना नवीन योजनांसाठी पैसे कुठून आणणार? असाही प्रश्न एकनाथ खडसेंनी उपस्थित केला आहे.