एकनाथ खडसे भाजपामध्ये परतणार…की नुसतेच ‘एप्रिल फूल’ करणार ?
-दिल्लीला रवाना झाल्याने तर्कवितर्कांना ऊत
Eknath Khadse | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शरद पवारांची साथ सोडून लवकरच भाजपाचे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे आहे. दरम्यान, खडसे रविवारी (ता.31 मार्च) रात्री अचानक दिल्लीकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्काना चांगलाच ऊत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खडसे भाजपमध्ये परतणार असल्याचे बोलले जात होते. यावेळी ते खरोखर भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत की नुसतेच एप्रिल फूल करणार आहेत, याविषयी अनेकांच्या मनात शंका देखील आहे.
भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांना शरद पवारांनी विधान परिषदेची उमेदवारी देऊन आमदारकी बहाल केली. त्याची आठवण ठेवून शरद पवार यांनीच मला अंधारातून बाहेर काढले, अशी भावना एकनाथ खडसे व्यक्त करताना देखील दिसतात. राष्ट्रवादीमधून अजित पवार बाहेर पडल्यावरही त्यामुळे त्यांनी शरद पवारांचा हात सोडला नव्हता. दरम्यानच्या काळात काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या रावेर मतदारसंघातून भाजपाने त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्यानंतर शरद पवारांनी आपला हक्काचा वजीर वापरण्याच्या दृष्टीने चाल खेळून पाहिली. प्रत्यक्षात एकनाथ खडसे किंवा त्यांची मुलही रोहिणी खडसे यांच्यापैकी कोणीच त्यांच्या हाती लागले नाही. एकप्रकारे सुनेची पाठराखण करून एकनाथ खडसेंनी शरद पवारांना कोणताच थारावारा न दिल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. अर्थातच, या वेगवान घडामोडीत खडसे परिवार अप्रत्यक्षपणे भाजपाकडे ओढला जात असल्याची जाणीव शरद पवारांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीला झाल्याशिवाय राहिली नाही. राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी मागे त्याबद्दल जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली होती. तशात आता एकनाथ खडसेंनी अचानक दिल्लीची फ्लाईट पकडल्याने त्यांच्या भाजपा प्रवेशाबद्दलच्या चर्चांना जरा जास्तच जोर आल्याचे दिसून आले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनीही काही दिवसांपूर्वी दिला होता सूचक इशारा
एकनाथ खडसे यांनी स्वतः आपल्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून भाजपमध्ये परतण्याची ऑफर दिल्याचा दावा केला होता. त्यानंतर भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांनीही काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे भाजपामध्ये पुन्हा परतणार असल्याचा सूचक इशारा दिला होता. “खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी जोर लावत असल्याची चर्चा माझ्या कानावर आली आहे. दिल्ली व राज्यातून माझ्यापर्यंत ही बातमी पोहोचली आहे. खडसे पुन्हा भाजपमध्ये हवेत की नाही, असा प्रश्न मला अद्याप कुणीही विचारला नाही. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. पण एकनाथ खडसे यांची थेट हॉटलाइन असेल तर त्यांनी ती जरूर वापरावी,” असे महाजन म्हणाले होते.