भाजपमध्ये प्रवेश होत नाही तेवढ्यातच एकनाथ खडसेंनी उचलले ‘हे’ मोठे पाऊल !
जळगाव टुडे । शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले आमदार एकनाथ खडसेंचा राजकीय वनवास लोकसभेच्या निवडणुकीनंतर संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण, त्यांना भाजपमध्ये लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षात आपल्या मागे लागलेला चौकशांचा आणि कोर्ट कचेऱ्यांचा ससेमिरा कमी व्हावा म्हणून एकनाथ खडसे यांनी आता मोठे पाऊल उचलले आहे. ज्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा देखील आहे. ( Eknath Khadse )
भाजपमध्ये सर्व काही सुखनैव सुरू असताना मुख्यमंत्री पदावर दावा केला एकनाथ खडसेंच्या पडत्या काळाला सुरूवात झाली. तेव्हापासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत खडसेंना त्याची मोठी किंमत देखील चुकवावी लागली. यथावकाश पूर्वीचे दिवस परत येण्याची आशा निर्माण झाल्यानंतर एकनाथ खडसे मागचे सर्व काही विसरून पुन्हा नव्या जोमाने व उत्साहाने कामाला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरणात स्वतः आणि त्यांच्या कुटुंबियांना दोषमुक्त ठरवावे म्हणून त्यांनी आता न्यायालयात नव्याने अर्ज दाखल केला आहे.
खडसेंचे जावई होते दोन वर्ष तुरूंगात
पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहाराच्या खटल्यात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकीनी खडसे यांचे नाव असूनही त्यांना तपास यंत्रणेने अद्याप अटक केलेली नाही. मात्र, त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती आणि त्यांना दोन वर्ष तुरूंगात काढावे लागल होते. नंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. खडसेंनी आता या प्रकरणातून दोषमुक्ती मिळावी म्हणून वकिलामार्फत अर्ज केला आहे. राजकीय हेतूने आपल्याला या प्रकरणात गोवण्यासाठी प्रयत्न झाला होता, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. एकनाथ खडसे यांनी सन २०१६ मध्ये पदाचा गैरवापर करुन भोसरीत त्यांची पत्नी व कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. खडसे कुटुंबाने ही जमीन ३.७५ कोटींमध्ये खरेदी केली होती, ज्याची किंमत तब्बल ३१.१ कोटी रुपये होती, असा आरोप ईडीने त्यावेळी केला होता.