अमित शहा-एकनाथ खडसे यांची फक्त सदिच्छा भेट की आणखी दुसरे काही ?

राजकीय चर्चांना सगळीकडे उधाण

जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील पक्ष नेतृत्वाचे पंख छाटण्यासह जुन्या नेत्यांकडे पुन्हा नवीन जबाबदारी सोपविण्याची तयारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सध्या चालवली आहे. त्यात भाजपमध्ये घरवापसी करण्याच्या प्रयत्नात असलेले आमदार एकनाथ खडसे यांनी केंद्रीय मंत्री असलेल्या सून रक्षा खडसे यांच्यासह दिल्लीत अमित शहांची भेट घेऊन आणखी मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यांची ती भेट फक्त सदिच्छा भेट होती आणखी काही, याबाबत आता चांगलीच चर्चा रंगली आहे. ( Eknath Khadse )

राज्यातील भाजपचे नेतृत्व सांभाळणाऱ्या काही नेत्यांनी जोरदार विरोध केल्यामुळे एकनाथ खडसे यांचा भाजपमधील पक्ष प्रवेश बऱ्याच दिवसांपासून रखडला आहे. वास्तविक लोकसभेच्या निवडणुकीत सून रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर एकनाथ खडसेंनी भाजपचा खुला प्रचार केला. वैयक्तिक ताकद वापरून सूनेला निवडणुकीत अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देण्यात मोठा हातभार देखील लावला. त्याचेच फळ म्हणून आता रक्षा खडसेंना केंद्रात राज्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली आहे. तर खुद्द एकनाथ खडसेंना पुन्हा राज्याच्या राजकारणात मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू करण्यात आल्या आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी एकनाथ खडसेंची भेट घडून आल्यानंतर त्यावर आता जवळपास शिक्कामोर्तबच झाले आहे.

दरम्यान, अमित शहा तसेच एकनाथ व रक्षा खडसे यांच्यातील चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही. मात्र, विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंवर मोठी जबाबदारी टाकली जाण्याच्या दृष्टीने निश्चितच खास बातचीत दोघांमध्ये झाली असावी, असे सांगितले जात आहे. त्याविषयी अनेक तर्कवितर्क देखील लढवले जात आहेत. दुसरीकडे राज्यात यापुढे कोणत्या एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर पक्ष चालणार नसून सर्व संमतीनेच निर्णय घ्यावे लागतील, असे स्पष्ट करून केंद्राने देवेंद्र फडणवीसांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांना राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा महत्व प्राप्त होण्याचे संकेत मिळाले आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button