एकनाथ खडसेंचा वनवास अखेर संपणार; भाजपकडून मिळणार मोठी जबाबदारी !

जळगाव । लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून भाजपमध्ये घरवापसी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकनाथ खडसे यांना काहीना काही कारणांवरून ताटकळावे लागले आहे. शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी सोडल्यापासून त्यांच्या नशिबी एकप्रकारे राजकीय वनवास आलेला आहे. मात्र, उशिरा का होईना आता त्यांचा वनवास संपण्याची चिन्हे दिसून आली आहेत. कारण, भारतीय जनता पार्टीकडून लवकरच त्यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. ( Eknath Khadse )

लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नव्या दमाने तयारीला वेग देण्यात आला आहे. दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीतही त्याच विषयावर चर्चा झाली. राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम ठेवून, भाजपमध्ये प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेले एकनाथ खडसे यांना प्रवेश देण्याच्या बाबतीत देखील सदरच्या बैठकीत निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. फक्त पक्ष प्रवेशच नाही तर भाजपमध्ये मोठी जबाबदारी खडसे यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांना निवडून आणण्याच्या अटीवर एकनाथ खडसे यांचा भाजपमधील पक्ष प्रवेश इतके दिवस रखडला होता, अशीही चर्चा काही दिवसांपूर्वी होती. आता रक्षा खडसे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या असल्याने त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांचा भाजपमधील प्रवेश थांबविण्यात काहीच अर्थ नाही, अशी भूमिका भाजप नेतृत्वाने घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील त्यासंदर्भात सूचक विधान करून खळबळ उडवून दिलेली आहे. एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील घरवापसीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांचा विरोध असल्याचे बोलले जात होते. मात्र, दोघांचा विरोध आता मावळला असून खडसेंना भाजपमध्ये मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button