सुनेला केंद्रात मंत्रिपदाची संधी; एकनाथ खडसेंचा भाजपमधीलच विरोधकांना शह !
जळगाव टुडे | रक्षा खडसेंना थेट केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर साहजिकच आमदार एकनाथ खडसे यांचे भाजपमधील राजकीय वजन आता वाढण्याचे संकेत आता मिळाले आहे. भाजपमध्ये घरवापसी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या खडसेंना मधल्या काळात बराच संघर्ष करावा लागला. भाजपच्याच स्थानिक व राज्यातील नेत्यांनी तीव्र विरोध केल्यामुळे ताटकळावे लागले. मात्र, सुनेला केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाचा विषय आता आपोआपच गुंडाळला जाणार आहे. सध्याच्या वेगवान घडामोडीनंतर खडसेंनी त्यांच्या भाजपमधील विरोधकांनाही मोठा शह दिल्याचे बोलले जात आहे. (Eknath Khadse)
सन 2014 मध्ये पहिल्यांदा रक्षा खडसे यांनी सुवर्ण व्यावसायिक मनीष जैन यांचा पराभव करून दिल्ली गाठली होती. तत्पूर्वी त्या कोथळीच्या सरपंच, जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती देखील राहिल्या होत्या. पुढे जाऊन पाच वर्षांनंतर रक्षा खडसे यांना पुन्हा सन 2019 मध्ये लोकसभेची उमेदवारी मिळाली होती आणि त्या दुसऱ्यांदा रावेरच्या खासदार देखील बनल्या होत्या. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने विरोधकांचा माईंड गेम केला. तेवढ्यावरच न थांबता रक्षा खडसेंना आता थेट केंद्रात मंत्रिपदाची शपथ देण्याची तयारी दाखवली. अर्थातच, जळगाव जिल्ह्याच्या तसेच उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात खडसे कुटुंबियांचा पुन्हा मोठा दबदबा निर्माण होण्याची चिन्हे त्यामुळे निर्माण झाली आहेत. विशेष म्हणजे ही सधाच्या घडीला भाजपमध्ये आम्ही म्हणजेच सर्वकाही म्हणणाऱ्यांना मोठी चपराक मानली जात आहे.
जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
जिल्ह्यातील कोथळी (ता.मुक्ताईनगर) येथील ग्रामपंचायचीच्या सरपंचपदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या खासदार रक्षा खडसे ( Raksha Khadse) ह्या नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वयाच्या 37 व्या वर्षी आज केंद्रातील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. रावेरमधून तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर त्यांना यावेळी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेण्याची संधी मिळत असून, जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचातही त्यामुळे मानाचा तुरा खोवला जाणार आहे. आता त्यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी देण्यात येते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.