रामदेववाडी अपघात प्रकरणाला नवे वळण; श्रीमंतांच्या मुलांसोबत मुलगी पण होती !
आमदार एकनाथ खडसेंचे खळबळजनक वक्तव्य
जळगाव टुडे । तालुक्यातील रामदेववाडी येथे मातेसह तिचे दोन चिमुरडे आणि भाच्याला चिरडणाऱ्या कारमधील तीन संशयितांना पोलिसांनी एकदाचे ताब्यात घेतले आहे. तिघांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी देखील करण्यात आली आहे. दरम्यान, या अपघात प्रकरणाला आता नवे वळण प्राप्त होण्याचे संकेत मिळाले आहे. कारण, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse ) यांनी कारमधील मुलांसोबत एक मुलगी देखील होती, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.
रामदेववाडीत 7 मे रोजी घडलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील दोन्ही संशयित तरूणांवर इतके दिवस कोणतीच कारवाई न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात होता. मात्र, जळगाव पोलिसांनी उशिरा का होईना दोषींच्या अटकेची कारवाई केली आहे. चार जणांचा बळी घेणाऱ्या कारमधील दोन्ही संशयित तरूणांमध्ये जळगाव जिल्ह्यातील एका मंत्र्यांच्या मर्जीतील कौल नामक बिल्डरसह जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्या मुलाचा तसेच अन्य एका तरूणाचा देखील समावेश आहे.
पोलिस अपेक्षेनुसार न्यायालयात बाजू मांडताना दिसून आलेले नाहीत
दरम्यान, “अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारमधील तरूणांना राजकारण्यांच्या दबावामुळे पोलिसांनी तब्बल 17 दिवस ताब्यात घेतले नाही. घटना घडल्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी सहा तासांचा वेळ घालविण्यात आला. पारोळ्यात दोषी तरूणांच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर अंमली पदार्थांचा अंमल बऱ्याचअंशी कमी झालेला होता. त्यामुळे पोलिसांनी दोषींचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. प्राप्त माहितीनुसार कार अपघातास कारणीभूत ठरलेल्या मुलांसोबत एक मुलगी देखील होती. तसा जबाब एका जबाबदार नेत्याने पोलिस अधिक्षकांसमोर दिला आहे. सर्वांचे सीडीआर तपासण्याची सूचना आम्ही पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. सत्य बाहेर आलेच पाहिजे. पोलिस अपेक्षेनुसार न्यायालयात बाजू मांडताना दिसून आलेले नाहीत. गोरगरिबांना योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून द्यावा,” असेही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवले आहे.