एकनाथ खडसेंकडून सोयीचे राजकारण; भाजपमध्ये राहून लेकीला बनविणार राष्ट्रवादीची आमदार !

यापुढे स्वतः कोणतीच निवडणूक न लढण्याची घोषणा

जळगाव टुडे । लोकसभा निवडणुकीनंतर घरवापसी झाल्यावर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मुक्ताईनगरसाठी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना संधी मिळण्याची चर्चा आहे. त्यामुळे बाप आणि लेकीमध्येच विधानसभा निवडणुकीत सामना रंगण्याची चिन्हे निर्माण झालेली असताना, लेकीला विधानसभेवर पाठविण्यासाठी एकनाथ खडसेंमधील बाप आजपासूनच तयारीला लागल्याचा प्रत्यय आला आहे. लेकीसाठी यापुढे कोणतीच निवडणूक न लढण्याची घोषणाही त्यांनी करून टाकली आहे.

महायुतीच्या लोकसभा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावलेली असताना, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेले एकनाथ खडसे यांनी अचानक यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नसल्याची भूमिका जाहीर करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. अर्थातच, यापुढे निवडणूक लढणार नसले तरी राजकारणातून मात्र ते निवृत्त होणार नाहीत. भारतीय जनता पार्टीचाच प्रचार करणार आहेत. खडसेंनी अचानक घेतलेल्या या नव्या भूमिकेबद्दल भाजपच्या कोणी नेत्यांनी अद्याप कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.

भाजपाला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2020 मध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या देखील होत्या. नंतरच्या काळात राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंना आमदारकी मिळवून दिली तर त्यांच्या कन्येला महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद. शरद पवारांच्या साथीने एकनाथ खडसे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय देखील झाले होते. परंतु, राष्ट्रवादीत भवितव्य दिसत नसल्याचे कारण देत त्यांनी आता पुन्हा भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीतच भवितव्य दिसत असून, त्यांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल न टाकता शरद पवारांसोबतच राहण्याचा आणि विधानसभेची आगामी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. अशा या परिस्थितीत भाजपाकडून पुढे मुक्ताईनगरची उमेदवारी मिळाल्यास आपल्याला थेट लेकीशी लढत द्यावी लागू शकते, याचा अंदाज आल्याने एकनाथ खडसेंनी आतापासूनच सावध भूमिका घेतली आहे. तसेच यापुढे निवडणुका न लढण्याची घोषणा केल्याचे बोलले जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button