एकनाथ खडसेंचे सुरेशदादांच्या पाऊलावर पाऊल…यापुढे कोणतीच निवडणूक लढणार नसल्याची घोषणा
जळगाव टुडे । ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी शिवसेवा उबाठा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर, त्यांचे एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनीही एक मोठी घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अर्थात, सुरेशदादांनी जसा निवृत्तीनंतर भाजपाला पाठींबा दिलाय, अगदी तसेच यापुढे निवडणूक लढविणार नसलो तरी राजकारणातून निवृत्त न होता भाजपासाठी काम करणार असल्याचे खडसेंनी देखील म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी देशात आणि राज्यात नरेंद्र मोदींच्या सत्तेच्या विरोधात लाट असल्याचे खळबळजनक वक्तव्य एकनाथ खडसेंनी केले होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीत उठलेला धुरळा शांत होत नाही तेवढ्यात एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीतून एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा धमाका केला आहे. खडसेंच्या म्हणण्यानुसार, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही. पण आता त्यांचा कल निवडणूक लढवण्याकडे राहिलेला नाही.
एकनाथ खडसे असेही म्हणाले आहेत, की “रोहिणीताई राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे त्या प्रामाणिकपणे राष्ट्रवादीच्या प्रचाराचे काम करत आहेत. त्यामुळे नंतरच्या कालखंडात मी भाजपात प्रवेश केला तर भाजपाचेच काम करणार आहे. यापुढे निवडणूक लढवण्याची माझी अजिबात इच्छा नाही. मी सध्या विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी मला सांगितले आहे की मी दिलेली वस्तू परत घेत नाही. शरद पवारांनीच मला अभय दिलेले असल्याने मला दुसरा कोणी राजीनामा मागितला तरी फरक पडत नाही.”