जळगावचा लेवा समाज नाराज ? एकनाथ खडसेंच्या प्रतिमेला चपला मारण्यात स्मिता वाघ होत्या सर्वांच्या पुढे !

जळगाव टुडे । लोकसभेची निवडणूक ही जाती-पातीवर किंवा समाजावर लढली जात नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवेळी जात-पात किंवा समाज हे मुद्दे गौण देखील ठरतात. मात्र, संबंधित उमेदवाराचे भवितव्य ठरविणारे मतदार हे मागचे काही हिशेब चुकते करण्याच्या मानसिकतेत नक्कीच असतात, हे कोणीच नाकारणार नाही. जळगाव लोकसभा मतदारसंघात प्राबल्य असलेला लेवा समाज सुद्धा सध्या वेगळ्याच मूडमध्ये असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या प्रतिमेला ज्यांनी कोणी काही दिवसांपूर्वी चपला मारल्या होत्या, त्यांचा वचपा लोकसभेच्या निवडणुकीत काढण्याचा विचार लेवा समाज सध्या करीत असल्याची अफवा सगळीकडे पसरली आहे.

जळगाव जिल्ह्यातील लेवा समाजाचे नेतृत्व मधुकरराव चौधरी यांच्यानंतर एकनाथ खडसे यांनीच प्रदीर्घ काळ केलेले आहे. एकवेळी अशी होती की लेवा समाज काँग्रेसचा पंजा सोडून दुसऱ्या कोणालाच मतदान करत नव्हता. लेवा समाज ही काँग्रेस पक्षासाठी हक्काची व्होट बँक होती. काँग्रेसचा जबरदस्त फॅन असलेला लेवा समाज भारतीय जनता पार्टीकडे वळविण्याचे पहिले काम कोणी केले असेल तर ते एकनाथ खडसे यांनी. भाजपाला ओबीसी चेहरा मिळवून देण्यात एकनाथ खडसेंनी कोणतीच कसर न ठेवल्यामुळेच नंतर भाजपाने जळगाव जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व देखील प्रस्थापित केले. दुर्दैवाने नंतर असे काही चक्र फिरले की खुद्द खडसेंना भाजपामध्ये कोणतेच मानाचे स्थान राहिले नाही. आताही ते भाजपामध्ये घरवापसी करण्याचा प्रयत्न करीत असताना, त्यांचा अवमान त्यांच्याच हाताखाली कधीकाळी काम केलेल्या आणि नेतेपदी जाऊन बसलेल्या लोकांकडून सातत्याने होतो आहे. हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत असलेल्या लेवा समाजाच्या मनात खडसेंबद्दलची सहानुभूती त्यामुळे अजुनच वाढली आहे. त्याचेच पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जळगावमधील त्या घटनेनंतर एकनाथ खडसेंच्या डोळ्यात आले होते अश्रू
भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल अपशब्द वापरला म्हणून 24 नोव्हेंबर 2023 रोजी जळगाव शहरातील लालबहादूर शास्त्री टॉवर चौकात भाजपच्या महिला आघाडीने राष्ट्रवादीचे तत्कालिन नेते व आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेला चपलांचा मार दिला होता. प्रसंगी खडसेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सु्द्धा केली होती. विशेष म्हणजे खडसेंच्या प्रतिमेला चपला मारण्यात आताच्या लोकसभा उमेदवार श्रीमती स्मिता वाघ ह्या सर्वात पुढे होत्या. जळगावच्या माजी महापौर सीमा भोळे ह्या देखील त्यांच्यासोबत होत्या. सदरची घटना अर्थातच एकनाथ खडसेंना खूपच जिव्हारी लागली होती. ज्यांना मी आयुष्यात मोठे केले त्यांनीच माझ्या प्रतिमेला जोडे मारले, हे बघून मला खूप वाईट वाटल्याचे त्यांनी त्यावेळी बोलुनही दाखवले होते. प्रसंगी त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील तरळले होते. खडसेंविषयी आस्था, जिव्हाळा बाळगून असलेल्या लेवा समाजाने ठरविले तर त्याचा मोठा फटका भाजपाला जळगावमध्ये लोकसभा निवडणुकीत बसू शकतो, असे बोलले जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button