जमिनीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाला डिझेल टाकून जिवंत जाळले !
जळगाव टुडे । शेतीच्या वादातून दोन भावांमध्ये किरकोळ भांडण तंटे होण्याच्या घटना बऱ्याच ठिकाणी घडताना दिसतात. त्या वादातून हाणामारीचे प्रकार देखील होतात. मात्र, नाशिक जिल्ह्यात दोन भावांमध्ये जमीन आणि विहिरीवरून झालेल्या वादात लहान भावाने वयोवृद्ध मोठ्या भावाला डिझेल टाकून जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Crime News )
Crime News
नाशिक जिल्ह्यातील सारोळे (ता.निफाड) येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेत वयोवृद्ध कचेश्वर महादू नागरे हे 95 टक्के भाजल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सारोळे थडी येथे नागरे बंधूमध्ये वडिलोपार्जित जमीन आणि विहिरीवरून वाद होता. या प्रकरणी २०२२ मध्ये निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झाला होता. मात्र वाद कायम होता. दरम्यान, वयोवृद्ध कचेश्वर नागरे आपल्या शेतातील घरासमोर साफसफाई करत होते. त्याचवेळी तिथे कचेश्वर नागरे यांचे धाकटे बंधू आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी संधी साधत त्यांच्या अंगावर डिझेल ओतले आणि पेटवून दिले.
कचेश्वर नागरे आग विझवण्यासाठी पळू लागले. त्यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर घरातील कुटुंबीय बाहेर पळत आले. आग विझवून त्यांना निफाडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर कचेश्वर नागरे यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पण सुमारे ९५ टक्के भाजल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कचेश्वर नागरे यांना जिवंत जाळून त्यांचा लहान भाऊ आणि दोन्ही पुतणे हे फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.