Dhule News : धुळे येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी कृषी व पाटबंधारे मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचे निधन…!
Dhule News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे माजी कृषी व पाटबंधारे मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील (वय ८४) यांचे आज शुक्रवारी (ता.२७ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता धुळे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात आमदार कृणाल पाटील आणि विनय पाटील ही दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
Dhule News : Senior leader of Congress in Dhule, former minister Dajisaheb Rohidas Patil behind the veil of time…!
दाजीसाहेब पाटील यांची प्रकृती मागील काही महिन्यांपासून खालावत होती. काही महिन्यांपूर्वी त्यांना कोल्हापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांची फुफ्फुसं कमी क्षमतेनं काम करत असल्याचं निदान झालं होतं. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, परंतु अलीकडच्या काळात त्यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाला, ज्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली. अखेर आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दाजीसाहेबांच्या निधनाबद्दल विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य जनतेकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक प्रामाणिक, समर्पित आणि जनतेच्या हितासाठी काम करणारा नेता गमावल्याचे बोलले जात आहे. धुळे जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्था काढून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा त्यांनी उपलब्ध करुन दिली होती.
‘धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यात रोहिदास पाटील यांचा मोठा वाटा होता. स्वत:च एक वेगळं वलय निर्माण करणारं काँग्रेसचं धुळे जिल्ह्यातील नेतृत्व आज हरपलं आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
रोहिदास पाटील यांची अंत्ययात्रा उद्या शनिवारी ( ता.२८) सकाळी ११ वाजता देवपूर येथील त्यांच्या नेहरू हौसिंग सोसायटी, येथील निवासस्थानापासून निघेल आणि एसएसव्हीपीएस कॉलेजच्या ग्राउंडवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तत्पूर्वी नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर येथील सुंदर सावित्री सभागृहात त्यांचे पार्थिव सकाळी ७ ते १० दरम्यान अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.