देवेंद्र फडणवीसांच्या कापूस भावांतर योजनेच्या घोषणेवर जळगावच्या तिन्ही मंत्र्यांचे मौन !
जळगाव टुडे । भाव पडल्याने हवालदिल झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन व कापूस भावांतर योजना राबविली जाणार असून, त्यासाठी सुमारे ४ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात लगेचच अनुदान जमा होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी जळगाव येथे २५ एप्रिल २०२४ रोजी केली होती. प्रत्यक्षात घोषणा करून दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी कोणतीच रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही.
लोकसभेच्या जळगाव तसेच रावेर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी २५ एप्रिल २०२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानिमित्त आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सोयाबीन, कापूस भावांतर योजनेविषयी मोठे विधान केले होते. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सर्वच शेतीमालाचे भाव कोसळल्यानंतर त्याचा मोठा फटका आपल्या देशातील कृषी क्षेत्रालाही बसला आहे. सोयाबीन व कापसाचे भाव पडल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. आम्ही वस्तुस्थिती लक्षात आणून देत योग्य तो पाठपुरावा केल्यामुळे केंद्र सरकारने कापूस भावांतर योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी सुमारे ४ हजार कोटी रूपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात लगेचच अनुदान जमा होईल, असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावच्या सभेत दिला होता.
मंत्र्यांनी तोंडातून चकार शब्द काढलेला नाही
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन व कापूस भावांतर योजनेविषयी केलेल्या घोषणेवेळी भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जळगावचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे देखील साक्षीदार होते. फडणवीसांनी केलेल्या घोषणेनुसार जळगाव जिल्ह्याचे शेतकरी आपल्या खात्यावर भावांतर योजनेचे अनुदान जमा होण्याची वाट पाहत बसलेले आहेत. मात्र, तिन्ही मंत्री त्या विषयावर सोयीस्कर मौन बाळगून बसले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ठिकठिकाणी धरणे आंदोलने देखील केली आहेत. तरीही तिन्ही मंत्र्यांनी अजुनही तोंडातून चकार शब्द काढलेला नाही. शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.