भाजपचे धक्कातंत्र…महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचे महत्व कमी होण्याचे संकेत !
जळगाव । महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्यानंतर पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. प्रत्यक्षात पक्ष श्रेष्ठींकडून त्यांना समजविण्याचाच प्रयत्न झाला होता. मात्र, आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यात यापुढे ठराविक एका नेत्याच्या मर्जीने पक्ष चालणार नसल्याचे स्पष्ट करून अप्रत्यक्षरीत्या देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय महत्व कमी करण्याचे संकेत दिल्याचे दिसून आले आहे. ( Devendra Fadnavis )
लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची कारणीमिमांसा करण्यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक आयोजित केली होती. त्यात झालेल्या चर्चेवेळी केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील भाजपच्या नेत्यांचे चांगलेच कान टोचल्याचे सांगितले जात आहे. तसेच यापुढील काळात ठराविक एका नेत्याच्या मर्जीने पक्ष चालणार नाही आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या सूचना देखील दिल्याचे बोलले जात आहे.
भाजपने एकत्रितपणे काम करायला हवे. ठराविक एका व्यक्तीच्या मर्जीने महाराष्ट्रात यापुढील काळात भाजप पक्ष चालू शकत नाही. कोअर कमिटीला सोबत घेऊनच पक्ष चालवावा लागणार आहे. विशेष म्हणजे भाजपच्या सर्व जुन्या नेत्यांना सक्रीय करण्याबाबत आता गांभीर्याने विचार करावा लागेल. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या विधानसभा निवडणुकांमध्ये टाळल्या गेल्या पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणायची आहे. त्यासाठी महायुतीत समन्वयाचा अभाव नको, अशाही सूचना भाजपच्या कोअर कमिटीने बैठकीत दिल्याची माहिती मिळाली आहे.