देवेंद्र फडणवीसांच्या राजीनामा नाट्यावर अखेर पडला पडदा….अमित शहांची मध्यस्थी

जळगाव टुडे | लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे सोपविण्याची तयारी चालवली होती. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज शुक्रवारी दिल्लीत महत्वाची चर्चा झाली. त्यात फडणवीसांची समजूत घालण्यात शहांना यश देखील आले आहे. त्यामुळे फडणवीसांनी तूर्त राजीनामा देण्याचा निर्णय लांबणीवर टाकल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची दिल्लीत सुमारे अर्धा तास बैठक झाली. याशिवाय त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. तूर्तास राजीनामा देऊ नका, पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर त्यावर आपण निर्णय घेऊ. तोपर्यंत महाराष्ट्रात काम सुरूच ठेवा, असा सल्ला अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मंत्री मंडळातून मुक्त करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्याबद्दल त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. परंतु, फडणवीस आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेर आज शुक्रवारी दिल्लीत शहा यांनी त्यांचे मन परिवर्तन केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या राजीनामा नाट्यावर सध्या तरी पडदा पडला आहे. त्यांच्या जागी गिरीश महाजन यांची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागण्याच्या चर्चेला देखील विराम मिळाला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button