महाराष्ट्रात राजकीय भूकंप…उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार ?
जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महायुतीची अतिशय वाईट अवस्था झाली असून, पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, फडणवीस यांनी अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्यासोबत काम करणारे अन्य काही मंत्री देखील राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची दुसरी बातमी समोर आली आहे.
लोकसभेच्या मंगळवारी घोषित झालेल्या निकालातून महाराष्ट्रात महायुतीला जनतेने नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या आधी 45 पेक्षा जास्त जागांवर दावा करणारी महायुती 17 जागांच्या पुढे जाऊ शकलेली नाही. भाजपा व मित्रपक्षांची अशी वाईट स्थिती झालेली असताना तुलनेत प्रतिस्पर्धी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीने 30 जागांवर मुसंडी मारलेली आहे. अर्थातच, महायुतीच्या महा पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर त्याचे खापर फोडले जात आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. केंद्रीय नेतृत्वाकडे आधीच त्यांच्याबद्दल नकारात्मक संदेश पोहोचला आहे. त्यामुळे कारवाई होण्याचे संकेत मिळाल्यानंतर लगेचच फडणवीसांनी राजीनामा देण्यासाठी पाऊल उचलले आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. याशिवाय भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून विनाद तावडे यांचे नाव पुढे येण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हकालपट्टीची तयारी देखील भाजपचे वरीष्ठ नेते करत असल्याचे अंधारे म्हणाल्या आहेत.