फडणवीस साहेब, कापूस व सोयाबीन भावांतर योजनेचे ४००० कोटी केव्हा देणार ?
चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सवाल
जळगाव टुडे । लोकसभा निवडणुकीवेळी जळगाव येथे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी तसेच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यात कापूस व सोयाबीन भावांतर योजनेसाठी ४००० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणार असल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात आचारसंहिता संपल्यानंतर देखील सोयाबीन व कापूस उत्पादकांना कोणतेच अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे दोन्ही मंत्री आपल्या शब्दाला जागून भावांतर योजनेचे ४००० कोटी रूपये केव्हा देणार, असा सवाल चोपडा तालुक्याच्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
सोयाबीन व कापूस भावांतर योजनेचे पैसे मंजूर असून, आचारसंहिता असल्याने निवडणूक संपली की लगेच वितरीत होणार असे देखील दोघेही मंत्री म्हणाले होते. पण अद्याप सारे सामसूम दिसत आहे. आपण शब्दाला जागून ते लवकर टाकावे अन्यथा विधानसभा निवडणूक काळात प्रत्येक ठिकाणी शेतकरी आपणास अडवतील व विचारतील, असा इशारा देखील चोपडा तालुक्याच्या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
तसेच जळगाव जिल्ह्यात गेल्यावर्षी अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने कापसासह खरिपातील इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. चोपडा तालुक्यात पावसाचा २१ दिवस खंड नसल्याने आगाऊ पीक विमा रक्कम मिळाली नव्हती. पण पिकविमा मिळण्यासाठीचे पीक कापणी प्रयोग झाले त्यात चोपडा तालुक्यात खूप कमी उत्पन्न आल्याचे स्पष्ट अहवाल अधिकाऱ्यांनी दिले आहेत. म्हणजे उंबरठा उत्पन्न कमी आहे तरी देखील अजून पीकविमा अद्याप वाटप झाला नाही, त्याबाबत देखील तत्काळ सरकार पातळीवर आदेश व्हावेत, अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. यावेळी शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस.बी.नाना पाटील, भागवत महाजन, डॉ. रविंद्र निकम,डॉ. सुभाष देसाई,अजित पाटील, कुलदीप राजपूत, प्रशांत पाटील, प्रमोद पाटील, अजय पाटील, प्रवीण पाटील, रफियोद्दिन पिंजारी, मन्साराम महाजन आदी उपस्थित होते.