चिंता वाढली…जळगावच्या मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये फक्त २६.४४ टक्के पाणीसाठा शिल्लक !

गेल्यावर्षी होता ३४.९३ टक्के पाणीसाठा

जळगाव टुडे । पावसाला अजुनही पाहिजे तेवढा जोर नसल्याने जिल्ह्यातील गिरणा, हतनूर आणि वाघुरसारख्या मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये आता फक्त २६.४४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्यावर्षी याच दिवसावर तिन्ही प्रकल्पांमध्ये ३४.९३ टक्के पाणीसाठा होता. त्यातुलनेत यंदा जवळपास ९ टक्क्यांनी कमी पाणीसाठा असून, शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता त्यामुळे वाढली आहे. ( Dam Water shortage )

जळगाव जिल्ह्यातील हतनूर तसेच गिरणा व वाघूर या मोठ्या प्रकल्पांची पाणी साठविण्याची एकूण क्षमता सुमारे १०२७.१० दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात सद्यःस्थितीत तिन्ही प्रकल्पात २७१.५३ दलघमी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, तापी नदीवरील हतनूर धरणात सध्या २८ टक्के पाणीसाठा आहे, तर गिरणा धरणात १२.२० टक्के आणि वाघुरमध्ये ५४.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वास्तविक गेल्यावर्षी याच दिवसावर हतनूर धरणात ३९ टक्के, गिरणामध्ये २२ टक्के आणि वाघुरमध्ये ५८ टक्के पाणीसाठा अस्तित्वात होता.

जळगाव जिल्ह्यातील अभोरा, मंगरूळ, सुकी, मोर, गूळ, बहुळा, बोरी, भोकरबारी, तोंडापूर, अग्नावती, अंजनी, मन्याड आणि शेळगाव बॅरेज या मध्यम प्रकल्पांची एकूण पाणीसाठा क्षमता सुमारे ३१४.२५ दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात आजच्या घडीला सर्व मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त २९.५२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्यावर्षी याच दिवसावर मध्यम प्रकल्पांमध्ये १८.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यातुलनेत यंदा मध्यम प्रकल्पांचा सरासरी पाणीसाठा थोडाफार वाढल्याचे दिसत आहे. मात्र, अंजनी तसेच भोकरबारी, बोरी, अग्नावती, हिवरा, बहुळा आणि मन्याड या सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा अद्याप शून्य टक्केच आहे. नजीकच्या काळात चांगला पाऊस पडला तरच कोरड्याठाक पडलेल्या सर्व सिंचन प्रकल्पांची स्थिती सुधारण्याची आशा आहे.

दरम्यान, उगमस्थळी चांगला पाऊस झाल्याने तापी नदीवरील हतनूर धरणाचे दोन दरवाजे सध्या अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. नदीच्या सांडव्यातून त्यामुळे २०४८ क्यसेक इतका पाण्याचा विसर्ग होत आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून मिळाली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button