जामनेरचा चंगू आणि चाळीसगावचा एजंट मंगू…उन्मेश पाटील यांची जहरी टीका

जळगाव टुडे । “जामनेरचा असा मंत्री दिला, जो मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचा नंबर एकचा मंत्री म्हणून आपण बघितला. हा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा नंबर एकचा मंत्री जिल्ह्याला नंबर एकवर न्यायचे तर विसरून गेला, पण नंबर दोनचे पैसे कमवायच्याच मागे लागला. हा जामनेरचा चंगू आणि चाळीसगावचा त्याचा एजंट मंगू, या चंगू आणि मंगुने जळगाव जिल्ह्याच्या विकासाला खीळ लावण्याचे काम केले आहे,” अशी जहरी टीका माजी खासदार उन्मेश पाटील यांनी येथे केली.

महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार करण बाळासाहेब पाटील-पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन मंगळवारी जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर मंगळवारी (ता.07) करण्यात आले होते. त्याप्रसंगी माजी खासदार उन्मेश पाटील बोलत होते. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीचेपदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून माजी खासदार उन्मेश पाटील हे सातत्याने भाजपच्या जळगाव जिल्ह्यातील नेतृत्वावर जहरी टीका करताना दिसून येत आहेत. त्यांच्या टीकेचा रोख विशेष करून भाजपचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरच असतो. जळगावमध्ये मंगळवारी पार पडलेल्या जाहीर सभेतही उन्मेश पाटील यांनी मंत्री महाजन आणि आमदार चव्हाण यांच्यावर नामोल्लेख न करता निशाणा साधण्याची संधी साधली. आता उन्मेश पाटलांच्या टीकेला मंत्री महाजन आणि आमदार चव्हाण हे कसे उत्तर देतात, त्याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button