Crime News : जिओ मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी करणारे चोरटे जळगाव एलसीबीच्या जाळयात अडकले….!
Crime News : जळगाव जिल्ह्यात मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरीस जाण्याचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. सदर आरोपींचा शोध घेवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिले होते. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.
Crime News : Thieves stealing batteries of Jio mobile tower in the net of local crime branch..!
जिओ मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी करणारे चोरटे शोधण्यासाठी एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलिस हवालदार संदिप पाटील, प्रविण मांडोळे, गोरख बागुल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, राहुल बैसाणे, विलास गायकवाड, भारत पाटील यांचे पथक तयार केले होते. १४ सप्टेंबर रोजी सदर पथकास गुप्त बातमीदारामार्फत या प्रकरणात मंगरुळ गावातील भिकन युवराज पाटील हा मुख्य संशयीत असल्याची बातमी मिळाली होती. त्यावरून पथकाने सदर संशयितास ताब्यात घेवून मोबाईल टॉवरचे बॅटरी चोरी प्रकरणात त्याचे अजून साथीदार आहेत का, याबाबत चौकशी केली. तेव्हा त्याने त्याच्यासोबत धर्मेंद्र फकिरा पाटील (रा. मंगरुळ) व अकरम अली कमरअली (रा. गांधलीपुरा अमळनेर) यांची नावे सांगितली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने धर्मेद्र फकिरा पाटील यास ताब्यात घेवून अकरम अली कमरअली याचा अमळनेर शहरात शोध घेतला. मात्र, तो कुठेच मिळून आला नाही.
मारवड व अमळनेर शिवारात बॅटरी चोरी केल्याची कबुली
संशयित आरोपी भिकन पाटील व धर्मेंद्र पाटील यांना विश्वासात घेवून मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांबाबत चौकशी केली असता भिकन पाटील याने मोबाईल टॉवरच्या एकुण १२ बॅटऱ्या काढून दिल्या. यावेळी भिकन युवराज पाटील याने आपण स्वतः तसेच धर्मेंद्र पाटील व अकरम अली अशा तिघांनी मिळून मारवड व अमळनेर शिवारात असलेल्या जिओ मोबाईलच्या बॅटऱ्या चोरी केल्याचे सांगीतले. खात्री केल्यानंतर मारवड पो.स्टे. CCTNS NO १२२/ २०२४ भा.न्या. सं. कलम ३०३ (२), तसेच अमळनेर पो.स्टे. CCTNS NO २४९/२०२४ भादविकलम ३७९ प्रमाणे आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी भिकन यवराज पाटील आणि धर्मेद्र फकिरा पाटील या दोघांना तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेले TATA ACE (छोटा हत्ती) मालवाहतुक गाडी मारवड पो.स्टे. CCTNS NO १२२ / २०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) या गुन्ह्यात पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.
मुख्य आरोपी भिकन पूर्वी जिओ मोबाईल टॉवरचा टेक्नीशियन होता
यावेळी एलसीबीच्या पथकाने मुख्य आरोपी भिकन युवराज पाटील याची माहिती घेतली असता तो यापूर्वी जिओ मोबाईल टॉवरचा टेक्नीशियन म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली. तसेच तो बॅटरी चोरी करतांना त्याच्या यापूर्वीच्या जिओ कंपनीच्या आयकार्डचा वापर करीत होता, त्यामुळे त्याचेवर कोणी संशय घेत नव्हते. सदर गुन्ह्याची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, चाळीसगाव भागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.