Crime News : पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या गावाजवळ वाळू माफियाचा हवेत गोळीबार; नऊ जणांवर गुन्हा दाखल…!
Crime News : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावापासून जवळच असलेल्या चांदसर (ता.धरणगाव) येथे एका वाळू माफियाने हवेत गोळीबार करून दहशत माजविल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित फरार होण्यात यशस्वी ठरले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना करण्यात आली आहेत.
Crime News : Sand mafia fired in the air near Guardian Minister Gulabrao Patil’s village; A case has been filed against nine people…!
योगेश ईश्वर कोळी, आबा ईश्वर कोळी, गणेश सोमा कोळी, मोहन गोविंदा कोळी, कल्पेश महेश पाटील, राहुल भीमराव कोळी, राहुल दिलीप कोळी (सर्व रा.चांदसर) तसेच गोपाल कोळी, दीपक कोळी (रा.वाकटुकी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. चांदसरचे कोतवाल अमोल मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित सर्व संशयित गिरणा नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करण्याच्या उद्देशाने रस्त्यात खोदलेल्या चाऱ्या बुजवित होते. कोतवाल मालचे यांनी त्यांचे फोटो काढले तसेच त्यांना जाब विचारला. त्यावरून एका वाळूमाफियाने हवेत गोळीबार करून दहशत माजवली.
चांदसर गावाच्या परिसरात उडाली एकच खळबळ; ग्रामस्थ भयभीत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील चांदसर गावाजवळ गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतो. तो रोखण्यासाठी ग्रामस्थांनी गावाबाहेर चाऱ्या खोदून वाळु तस्करांचा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा बंद देखील होता. दरम्यान, अवैध वाळू उपसा पुन्हा सुरू करण्यासाठी वाकटुकी येथील काहीजण चाऱ्या बुजवत होते. याबाबत कोतवाल अमोल गुलाब मालचे यांना माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन चाऱ्या बुजविणाऱ्यांना त्याचा जाब विचारला. मात्र, कोतवालाचा राग येऊन वाळू माफियांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याच वेळी गोपाल कोळी याने त्यांच्याजवळील पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. त्यामुळे चांदसर गावाच्या परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. हवेत गोळीबार केल्यानंतर सर्व संशयित पळून गेले. घटनेची माहिती समजताच पाळधी पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी लगेच चांदसर गावात पोहोचले. घटनास्थळी चोपडा भागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी घोलप, पो.नि.पवन देसले यांनीही भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे, मधुकर उंबरे करीत आहेत.