जळगावमधील कारागृहात कैद्याचा खून…सुरक्षा रक्षकावर निलंबनाची कारवाई !
जळगाव टुडे । शहरातील जिल्हा कारागृहात बुधवारी (ता.१०) सकाळी दोन कैद्यांमध्ये झालेल्या वादाच्या घटनेतून एका कैद्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी कारागृह विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी गणेश पाटील या सुरक्षा रक्षकाला तातडीने निलंबित केले आहे. याशिवाय कारागृहाचे अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावल्याची माहिती मिळाली आहे. ( Crime News )
Crime News
धारदार शस्त्राने एका कैद्याचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर कारागृह प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवले गेले होते. एवढा कडक बंदोबस्त असताना कारागृहाच्या आत धारधार शस्त्र गेलेच कसे, असा प्रश्न देखील उपस्थित झाला. घडलेल्या खुनाच्या प्रकाराला जबाबदार धरून कोणावर कारवाई होते, त्याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. प्रत्यक्षात सुरक्षा रक्षक गणेश पाटील याच्यावर निलंबनाची कारवाई तातडीने करण्यात आली आहे. दरम्यान, कडेकोट बंदोबस्त असताना कारागृहाच्या आत खुनाच्या घटनेत वापरण्यात आलेला चाकू पोहोचलाच कसा, असा सवाल कारागृह विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.सुपेकर यांनी देखील चौकशीवेळी केला.
खून प्रकरणाला जबाबदार दोषी सुटणार नाही
कारागृहाच्या भिंतीवरून चाकू आतमध्ये फेकल्याचे सांगितले जात आहे. मात्र, फेकलेला चाकू कैद्यापर्यंत कोठडीत पोहोचलाच कसा आणि नियमित तपासणीत तो सापडून कसा आला नाही, या प्रश्नांची उत्तरे अजुनही अनुत्तरीतच आहेत. कैद्याच्या खून प्रकरणाला जबाबदार असलेला एकही दोषी सुटणार नाही. संबंधितांवर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा देखील डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिला आहे. दरम्यान, जळगावच्या कारागृहाबाहेर पोलिसांची गस्त वाढविण्यासह सीसीटीव्ही यंत्रणा आणखी बळकट करण्याच्या सूचना देणारे पत्र पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना दिल्याची माहिती डॉ.सुपेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.