Crime News : मुख्याध्यापकाचा पहिलीच्या वर्गातील चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न; विरोध केल्यावर गळाच घोटला…!
Crime News : गुजरातमधील दाहोद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, अवघ्या सहा वर्षांच्या पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीची तिच्याच शाळेच्या मुख्याध्यापकाने गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीप्रमाणे, मुख्याध्यापकाने चिमुरडीला आपल्या कारमध्ये नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने आरडाओरडा केल्यामुळे त्याने तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह शाळेच्या मागील बाजूस फेकून दिला.
Crime News : Headmaster’s attempted rape of first class girl; After resisting, strangulated…!
सकाळी नेहमीप्रमाणे मुलीला शाळेत सोडण्यासाठी पहिलीच्या वर्गातील चिमुकलीची आई तिला घेऊन घरून निघाली होती. याचवेळी शाळेचा मुख्याध्यापक त्याच्या गाडीतून शाळेत जात होता. तेव्हा मुलीला आपण सोडतो, असे बोलून त्याने चिमुकलीला कारमध्ये बसवले. आईनेही विश्वासाने मुलीला मुख्याध्यापकासोबत कारमध्ये पाठवले. मात्र, वाटेत नराधम मुख्याध्यापकाने कारमध्ये बसलेल्या चिमुकलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण चिमुकलीने विरोध करत आरडाओरड केली. तिला गप्प करण्यासाठी नराधम मुख्याध्यापकाने अखेर त्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केली.
नराधम मुख्याध्यापकाने चिमुकलीचा मृतदेह दिवसभर कारमध्येच ठेवला होता
नराधम मुख्याध्यापकाने दिवसभर चिमुकलीचा मृतदेह आपल्या गाडीतच लपवून ठेवला. शाळेत पोहोचल्यावर दिवसभर त्याने साळसुदपणाचा आव आणून त्याची नेहमीची कामे आटोपली. आपले काळे कारनामे लपविण्यासाठी शाळा सुटल्यानंतर मुलीच्या चपला वर्गाच्या बाहेर आणि दप्तर वर्गामध्ये बाकावर ठेवले. नंतर चिमुरडीचा मृतदेह शाळेच्या मागच्या बाजूला निर्दयीपणे फेकून दिला. मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी न आल्याने हवालदिल झालेल्या पालकांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शाळेतील मुख्याध्यापकाला चौकशीसाठी बोलावले. प्राथमिक चौकशी दरम्यान मुख्याध्यापकाने सांगितले की, शाळा सुटल्यावर मुलगी कुठे गेली याची त्याला काहीच माहिती नाही. मात्र, तपास पुढे जाताच पोलिसांनी संशयावरून मुख्याध्यापकाला पोलिसा खाक्या दाखवला. सखोल चौकशीनंतप मुख्याध्यापकाने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.