Crime News : भोकर शिवारात कपाशीच्या पिकात गांजाची लागवड; शेतकऱ्याला पोलिसांनी केली अटक !
Crime News : कपाशीच्या शेतात गांजाची लागवड करणाऱ्या प्रकाश दशरथ सोनवणे (५८, रा. भोकर,ता.जळगाव) या शेतकऱ्याला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. सोनवणे यांच्या शेतातून गांजाची २७ झाडे जप्त करण्यात आली असून, त्यांचे वजन एकूण १२ किलो भरले आहे. गांजाच्या झाडांचे मूल्य सुमारे ४० हजार रुपये असल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी प्रकाश सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे.
Crime News : Cultivation of ganja in cotton crop in Bhokar Shivara; Police arrested the farmer!
जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भोकर-पळसोद शिवारात गांजाची शेती केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशावरून अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, सहाय्यक निरीक्षक अनंत अहिरे, उपनिरीक्षक गणेश सायकर, नयन पाटील, हेकॉ दीपक चौधरी, बापू पाटील, किरण अगोणे, चेतन पाटील, प्रवीण पाटील, दिनेश पाटील हे गांजाची लागवड असलेल्या शेतात पोहोचले.
शेतकरी प्रकाश सोनवणे यांच्या शेतातील कपाशीच्या पिकात गांजाची २७ झाडे लावलेली आढळून आली. पाच ते सहा फुटांपर्यंत त्यांची वाढ झालेली होती. पोलिसांनी नायब तहसीलदार दिलीप बारी, कृषी अधिकारी अमित भामरे, वजन मापे निरीक्षक अनंत पाटील यांचे समक्ष पंचनामा केला. गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, त्यांचे १२ किलो वजन व अंदाजे ४० हजार रुपये किंमत आहे.