Crime News : मोटार सायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक…!
Crime News : जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मोटारसायकली चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात यश आले आहे. दोन्ही चोरट्यांकडून सुमारे १ लाख २० हजार रूपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यांच्याकडून आणखी एक दुचाकी हस्तगत करायची बाकी आहे.
Crime News : Attal thieves who stole motorcycles arrested by local crime branch of Jalgaon…!
जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मोटार सायकल चोरीला जाण्याचे प्रमाणे वाढले आहे. याअनुषंगाने सदर आरोपींचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिले होते. त्यानुसार उपनिरीक्षक राहुल तायडे व दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, महेश सोमवंशी यांचे पथक तयार करण्यात आले होते.
दरम्यान, एलसीबीच्या पथकातील अंमलदारांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, करण लक्ष्मण गायकवाड (रा.कल्याणे होळ, ता.धरणगाव) हा चोरीची मोटार सायकल घेवून फिरत आहे. पोलिसांचे पथक हे बरेच दिवसापासून करण गायकवाडच्या मागावर होतेच. परंतु तो पोलिसांची नजर चुकवून आणि स्वतःची ओळख लपवून वावरत होता. मात्र, एलसीबीच्या पथकाने त्यास कल्याणे होळ येथून ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणे त्याचा साथीदार गोपाल सुरेश भिल (वय २२, रा.वराड, ता.चोपडा) यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडून १,२०,००० रूपये किंमतीच्या चार मोटार सायकल जप्त करण्यात आल्या.
याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरनं १८२ /२०२३ भादवि कलम ३७९ तसेच चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुरनं १९४/२०२४ भादवि कलम ३७९ आणि गुरनं ६३५/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल असून, उर्वरीत एक मोटार सायकलीचा शोध सुरु आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, चाळीसगाव भागाच्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.