Crime News : जळगावमधील ‘बीएचआर’ पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्याकडे सापडले सुमारे आठ लाख रुपये…!
Crime News : कर्जाच्या रकमेची एक रकमी परतफेड करण्यासाठी सुमारे दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी भाईचंद हिराचंद राययोनी (बीएचआर) पतसंस्थेचे अवसायक चैतन्य नासरे व वसुली अधिकारी सुनील पाटील यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, कार्यालयाच्या तपासणी करताना सुनील पाटील याच्या ड्रॉवरमध्ये सुमारे ८ लाख १२ हजार रुपये आढळून आले आहेत. सदरची रक्कम नेमकी कशाची आहे, याची चौकशी केली जाणार आहे.
Crime News : About eight lakh rupees found in the drawer of ‘BHR’ recovery officer in Jalgaon…!
मंगळवारी (ता.०३) कर्ज प्रकरणाच्या एक रकमी परतफेडीसाठी तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी अवसायक चैतन्य नासरे व वसुली अधिकारी सुनील पाटील या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना बुधवारी (४ सप्टेंबर) न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला.
दोघांनी किती प्रकरणांमध्ये लाच मागितली आहे? तसेच यात इतर कोणाचा सहभाग आहे का? यासह मालमत्तेचा तपास करून पुढील कारवाई करणे, कार्यालयात कॅशिअरकडे रोख रकमेचा भरणा असताना वसुली अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये आठ लाख १२ हजार आढळले. त्याची चौकशी करणे, अवसायक नासरे नागपूर येथील रहिवासी असून, त्यांच्या जंगम व स्थावर मालमत्तेची माहिती घेणे, डी मॅट अकाउंट, बँक लॉकर व इतर गुंतवणुकीची माहिती घेणे आणि दोघांच्या अपसंपदेची चौकशी पोलिस कोठडीच्या दरम्यान करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.