Crime News : जळगाव शहरात ११ वर्षीय मुलीवर ४० वर्षीय व्यक्तीने घरात कोंडून केला अत्याचार; मुंबईतून अटक !
Crime News : बदलापुरसह इतर ठिकाणच्या अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्यानंतर जळगाव शहरातही लपंडाव खेळणाऱ्या ११ वर्षीय मुलीवर एका नराधमाने घरात कोंडून अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रामानंदनगर पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केल्याची माहिती मिळाली आहे.
Crime News: A 40-year-old man raped an 11-year-old girl in Jalgaon city; Arrested from Mumbai!
पीडित मुलीच्या पालकांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशयित आरोपी सिद्धार्थ तायडे (वय ४०) याच्या घराजवळ १२ ऑगस्ट रोजी काही मुली लपंडाव खेळत होत्या. त्यापैकी ११ वर्षांची एक मुलगी आरोपीच्या घरात लपण्यासाठी गेली. त्याचाच फायदा घेऊन सिद्धार्थ तायडे याने घराचा दरवाजा व लाईट बंद करून सदर मुलीवर अत्याचार केले. दरम्यान, पीडित मुलीने आरडाओरड केल्यानंतर आरोपी तायडे याने तिचे तोंड दाबून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी बरेच दिवस कोणाजवळ काहीच बोलली नाही.
अखेर पीडित मुलीच्या आई-वडिलांनीच दिली पोलिसात फिर्याद
सिद्धार्थ तायडे याने धमकावल्यामुळे पीडित मुलीने बरेच दिवस कोणालाच काही सांगितलेले नसले तरी तिच्या आई-वडिलांना त्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून दोषी आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला, तेव्हा तो मुंबईला पळून गेल्याचे निदर्शनास आले. मात्र, रामानंदनगर पोलिसांनी साफळा रचून त्याला मुंबईत जेरबंद केले. त्यास आज शुक्रवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.