जामनेरमध्ये जाळपोळ, जमावाकडून रात्री पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक !
निरीक्षकासह बरेच पोलिस कर्मचारी जखमी
जळगाव टुडे । सहा वर्षाच्या बालिकेचा अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला अटक झाल्याचे माहिती पडताच जामनेर पोलिस ठाण्यावर गुरूवारी रात्री उशिरा मोठा जमाव चालून आला. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत त्यांनी पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक करीत बरेच नुकसान केले. दरम्यान, जमावाच्या दगडफेकीत पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह अन्य काही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. ( Crime News )
चिंचखेडा (ता.जामनेर) शिवारात ११ मे रोजी एका सहा वर्षाच्या बालिकेचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. सदरच्या घटनेतील संशयित आरोपी सुभाष भील (वय ३५, रा.चिंचखेडा) हा तेव्हापासून फरारच होता. त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. अखेर गुरूवारी तो भुसावळ शहरातील तापी नदीच्या परिसरात फिरताना दिसला. स्थानिक गुन्हे शाखेसह भुसावळच्या पोलिसांनी त्याला लागलीच जेरबंद केले.
दरम्यान, बालिकेचा अत्याचार करून खून करणारा आरोपी पकडण्यात आल्याची बातमी समजताच केकतनिंभोरा व परिसरातील मोठा जमाव रात्री साधारण दहाच्या सुमारास जामनेर पोलिस ठाण्याच्या आवारात एकत्र आला. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करणाऱ्या त्या जमावाला पोलिसांनी पांगविण्याचा प्रयत्न देखील केला. पण संतप्त जमावाने थेट पोलिस ठाण्यावरच दगडफेकीला सुरूवात केली. रबरी टायर जाळून प्रसंगी रास्तारोका सुद्धा केला. त्यामुळे त्याठिकाणी बराचवेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
जमावाकडून झालेल्या तुफान दगडफेकीत पोलिस निरीक्षक किरण शिंदे तसेच पोलिस कर्मचारी रामदास कुंभार, संजय खंडारे, राजू माळी, सुनील राठोड, रमेश कुमावत, प्रीतम बर्कले, नीलेश महाजन, सुनील आमोदकर हे देखील जबर जखमी झाले आहेत.