साखर कारखान्याकडून 61 कोटी रूपयांची फसवणूक; भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल !
जळगाव टुडे । कर्ज मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून बँक ऑफ इंडियाची सुमारे ६१ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना सातारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुईंज (ता.वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालिन चेअरमन तथा भाजपचे माजी आमदार मदन भोसले तसेच उपाध्यक्ष चंद्रकांत इंगवले, कार्यकारी संचालक अशोक भार्गव जाधव व अन्य लोकांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सगळीकडे चांगलीच खळबळ उडाली आहे. ( Crime News )
दिव्य मराठीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार नेहमीचे चांगले आर्थिक व्यवहार लक्षात घेता बँक ऑफ इंडियाने किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याला विस्तारीकरणासाठी सुमारे 50 कोटी रूपयांचे कर्ज मंजूर केले होते. दरम्यान, बँक ऑफ इंडियाकडून कर्जाच्या स्वरूपात मिळालेली संपूर्ण रक्कम नंतर सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या करंट खात्यावर वळविण्यात आली. याच वेळी बँकेने एक कोटी ७० लाख ४३१ रुपये रक्कम व्याजापोटी खात्यामध्ये जमा करून ती कारखान्याला दिली होती. प्रत्यक्षात कालांतराने किसन वीर सहकारी साखर कारखान्याकडून बँक कर्जाची परतफेड करण्यात आलीच नाही. असे असताना बँक ऑफ इंडियाकडे तारण असलेली मालमत्ता डोंबिवली नागरी सहकारी बँकेकडे तारण ठेवून त्यावर पुन्हा कर्ज उचलण्याचा प्रकार किसन वीर साखर कारखाना व्यवस्थापनाने केला.
आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर बँक ऑफ इंडियाचे पुणे विभागीय व्यवस्थापक (वसुली) अनिल कुमार श्रीवास्तव यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सीबीआयकडे तक्रार दाखल केली. कर्ज मिळवण्यासाठी बँकेकडे खोटी आर्थिक विवरणपत्रे व कागदपत्रे सादर केली व बँकेच्या सुविधांचा गैरविनियोग केल्याचे त्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पुणे येथील पोलीस आयुक्तालयात माजी आमदार भोसले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त मनीष हिरालाल नवलाखे पुढील तपास करत आहेत.