असोद्यात सट्टा पेढीवर भरदिवसा दरोडा; पिस्तुलचा धाक दाखवून 70 हजार लुटले !
जळगाव टुडे । तालुक्यातील असोदा येथे दुचाकीवर आलेल्या तिघांनी पिस्तुलचा धाक दाखवत सट्टा पेढीवर भरदिवसा दरोडा टाकून सुमारे 70 हजार रूपये लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदरच्या घटनेने असोद्यात सर्वत्र भितीचे वातावरण पसरले असून, पोलिसांचा कोणताच धाक शिल्लक राहिला नसल्याचे दिसून आले आहे. ( Crime News )
असोद्यातील बाजारपट्ट्यात एरवी नेहमीच गर्दी असते. त्याच ठिकाणी सट्ट्याच्या पेढीवर शुक्रवारी (ता.14) सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धाडसी दरोडा टाकला. त्यामुळे बाजारपट्ट्यात एकच धावपळ उडाली. दरोड्याच्या घटनेत एकाने हातातील गावठी कट्ट्याने शरद नारखेडे यांना मारहाण केली, तर दुसऱ्याला डोक्याला कट्टा लावून असतील नसतील तेवढे पैसे हवाली करण्याची धमकी दिली. घटनेनंतर ग्रामस्थ गावातील पोलिस चौकीवर पोहोचले. त्याठिकाणी घडलेली घटना त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली.
सट्टा पेढीवर धाडसी दरोडा टाकणारे तिघे असोदा गावातीलच रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा हे तातडीने असोदा येथे पोहोचले. या प्रकरणा रात्री उशिरापर्यंत संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सट्टा पेढीवर धाडसी दरोडा टाकण्यापूर्वी तिघांनी रेकी केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. ज्या ठिकाणी दरोडा पडला, त्याच्या समोरच सोन्याचे दुकान देखील आहे. तिन्ही संशयितांचे तिकडे बरे लक्ष गेले नाही. असोद्यातील कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती लक्षात घेता पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्याची मागणी त्यामुळे ग्रामस्थांनी केली आहे.