जळगावच्या ‘विकास’चा दूध पावडरने भरलेला ट्रक लांबवला; 74 लाखांचा अपहार !
जळगाव टुडे । शहरातील जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच विकासचा सुमारे 74 लाख 45 हजार रूपये किंमतीचा दुधाच्या पावडरने भरलेला ट्रक लांबवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील दोघांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल भवारी हे करीत आहेत. (Crime News)
जळगावच्या दूध संघाकडून परराज्यात दुग्धजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. त्यानुसार आठवडाभरापूर्वी 05 जून रोजी दुधाच्या पावडरने भरलेला ट्रक लखनऊकडे रवाना करण्यात आला होता. ज्याची किंमत सुमारे 74 लाख 45 हजार रूपये इतकी होती. दरम्यान, ट्रकचा चालक फिरोज सरजुद्दीन (रा.आग्रा, उत्तर प्रदेश) आणि क्लिनर रूस्तम कमलेश बघेल (रा.चतूर, मध्यप्रदेश) यांनी निश्चित स्थळी दूध पावडर घेऊन न जाता मालाची परस्पर विल्हेवाट लावली.
घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर ट्रकचा चालक आणि क्लिनर यांच्या विरोधात आता जळगावच्या शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुमारे 74 लाखांच्या मुद्देमालासह दोन्ही संशयितांना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर त्यामुळे उभे राहिले आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या रकमेची दूध पावडर परराज्यातील दोन व्यक्तींच्या हवाली करताना कोणतीच काळजी कशी घेतली गेली नाही, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे.