बॉलिवूड स्टार सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीला अखेर अटक !

जळगाव टुडे । बॉलिवूड स्टार सलमान खानच्या घर आणि फार्म हाऊसची रेकी करून हत्येचा कट रचल्याचे उघडकीस आल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांनी दीपक उर्फ जोनी याला भिवानी येथे जेरबंद केले असून त्याला पुढील कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. भिवानी सीआयए स्टाफ-2 च्या पोलिसांनी देखील कारवाईत भाग घेतला. (Crime News)

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पनवेल शहर नवी मुंबई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपी सलमानच्या हत्येसाठी कट रचत होते, तेवढ्यातच नवी मुंबई पोलिसांना त्याचा सुगावा लागला. हत्येचा कट उधळून लावत पाच आरोपींना अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आल्याने सलमानच्या जीवावरील मोठे संकट आता टळले आहे.

अभिनेता सलमान खानचे घर आणि फार्म हाऊसची रेकी करून त्याच्या हत्येची योजना आरोपींकडून आखण्यात आली होती. दरम्यान, तिगराणा- भिवानी या गावात राहणाऱ्या एका व्यक्तीचाही हत्येच्या कटात सहभाग असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सीआयए स्टाफ-2 भिवानी यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर दोन्ही ठिकाणच्या पोलिसांच्या संयुक्त पथकाने दीपक उर्फ जोनी या आरोपीला रात्री भिवानी येथून अटक केली. त्याच्या इतर साथीदारांना अटक झाल्यानंतर तो भिवानीत पळून गेला होता आणि तिथे लपून बसला होता. मात्र, मिळालेल्या माहितीच्या आधारे नवी मुंबई पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला तेथून जेरबंद केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button