चोपडा ग्रामीण पोलिसांनी गावठी कट्ट्यासह पुण्याच्या तिघांना सापळा रचून पकडले
Crime News : जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिसांनी सत्रासेनमार्गे तीन गावठी कट्टे घेऊन कारने निघालेल्या पुणे जिल्ह्याच्या तिघांना सापळा रचून बुधगाव येथे शुक्रवारी पहाटे 2.00 वाजता पकडले आहे. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील तिघांच्या विरोधात हत्यार कायदा कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की सत्रासेनमार्गे एका राखाडी रंगाच्या एर्टिगा कारमध्ये (एमएच 12/ आरएफ 1496) तीन इसम हे गावठी कट्टे घेऊन निघाले आहेत. त्यानुसार रात्री गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून बुधगाव येथे सदर गाडीला थांबविले. गाडीची झडती घेतल्यानंतर त्यात विनापरवाना तीन गावठी कट्टे तसेच आठ जिवंत काडतूस, असा सुमारे 8 लाख 42 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल सापडला. याप्रकरणी जफर रहीम शेख (वय 33, रा. भाजीबाजार घोडनदी, ता. शिरूर), तबेज जाहीर शेख (वय 29, सेंटर दवाखानासमोर रिव्हेलीन कालनी, ता. शिरूर) आणि कलीम अब्दुल रहेमान सय्यद (वय 34) यांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव भागाच्या अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीणचे प्रभारी पोलिस अधिकारी कावरी कमलाकर, पोलिस नाईक शशिकांत पारधी, हवालदार किरण धनगर, सहाय्यक फौजदार राजू महाजन, देविदास ईशी, प्रमोद पारधी, मनेष गावित, विनोद पवार, महेंद्र भील, संदिप निळे आदींनी कारवाईत भाग घेतला.