जळगावमध्ये उद्योजकाला गुंगीचे औषध पाजून नेपाळी नोकराने टाकला दरोडा
जळगाव टुडे । शहरातील दूध फेडरेशन परिसरात शिवाजीनगर रस्त्यालगत राहणारे राजा ट्रॅक्टरचे संचालक उद्योजक राजा मयूर यांच्या बंगल्यावर त्यांच्याकडे कामाला असलेल्या नेपाळी नोकराने दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. शहर पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा पूर्ण केला असून, चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, दरोड्यात नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला त्याची माहिती मिळू शकलेली नाही. (Crime News)
उद्योजक राजा मयूर यांच्या घराच्या बाजुला असलेल्या खोलीत नोकर विकास नेपाळी हा राहत होता. या बंगल्यात दोन सुरक्षारक्षक देखील रात्रीला पहारा देत असतात. गुरुवारी रात्री साधारण साडेदहा वाजता विकास नेपाळी याने भावाला मुलगा झाला आहे, असे सांगून सुरक्षारक्षक वसंत श्रीखंडे व उदय समेळ यांना त्याने गुंगीचे औषध टाकलेले सरबत बळजबरी पाजले. तसेच त्याने राजा मयूर यांना तेच सरबत पाजले. त्यामुळे दोनही सुरक्षारक्षक आणि राजा मयूर हे लगेच बेशुद्ध झाले. ती संधी साधून काही वेळाने नेपाळी याने अन्य चार जणांना बोलावून घेतले. राजा मयूर यांच्या पत्नी शैला मयूर यांनाही बाथरूममध्ये कोंडले. विकास नेपाळी व त्याचे इतर चार अज्ञात साथीदार यांनी मिळून घरातील मुख्य खोली उघडून सामान अस्ताव्यस्त करून मौल्यवान वस्तू व सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगावचे उप विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित व पोलिसांचे पथक घटनास्थळी लगेच दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा पूर्ण करून पुढील तपासाला लागलीच सुरूवात देखील केली. दरोड्याच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.