भुसावळ हत्याकांड…पोलिसांनी मुख्य आरोपी करण पथरोडवर नाशिकमध्ये घातली झडप

जळगाव टुडे । भुसावळ येथील माजी नगरसेवक संतोष राखुंडे आणि सामाजिक कार्यकर्ता सुनील राखुंडे यांची बुधवारी (ता.29) रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी तसेच विनोद चावरीया आणि अन्य काही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर आता हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी करण पथरोड याच्यावर नाशिकमध्ये झडप घातली आहे. त्याच्याजवळून दोन पिस्टल व पाच जीवंत काडतूस देखील जप्त करण्यात आले आहे. (Crime News)

नाशिक येथील गुंडा विरोधी पथक हे भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना माहिती मिळाली होती की, भुसावळ शहरात झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक आरोपी द्वारका परिसरात भटकत आहे. त्यानुसार सदर पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांनाही माहिती देण्यात आली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली द्वारका येथे पथकाने सापळा रचून बोहरी पेट्रोलपंपाजवळ थांबलेल्या करण पथरोड याच्यावर झडप घातली. त्याने पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्न केला. मात्र, पोलिस पथकाने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला आता भुसावळ शहर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. त्याच्याजवळून गुन्ह्यात वापरलेली दोन देशी पिस्टल तसेच पाच जीवंत काडतुसे, असा एकुण 84 हजार 400 रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

नाशिक शहराचे पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा.पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, डी.के.पवार, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, राजेश सावकार, सुनिल आडके, नितीन गौतम, गणेश नागरे यांनी सदरची कामगिरी यशस्वी केली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button